
अणुऊर्जा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तिच्या मदतीने अनेक मोठमोठे प्रकल्प राबवले जातात. आता या अणुऊर्जेचा वापर करून चक्क विमान उडवले जाणार आहे. ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगवान असणाऱ्या या विमानाचे डिझाइन स्पॅनिश डिझायनर ‘ऑस्कर विन्लास’ यांनी तयार केले आहे. काही तासांचा प्रवास काही मिनिटांमध्ये पूर्ण करण्याची या विमानाची क्षमता असेल.
हे एक सुपरसॉनिक विमान असून सध्या अत्यंत वेगवान मानल्या जाणाऱ्या ‘कॉन्कर्ड’ विमानापेक्षादेखील ते सरस असणार आहे. लंडन ते न्यूयॉर्क हे 5586 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सध्याच्या विमानांना साधारण सात तास लागतात. नव्या सुपरसॉनिक विमानाने हे अंतर अवघ्या 80 मिनिटांत म्हणजे 1 तास 20 मिनिटांत कापणे सहजशक्य होणार आहे. अर्थात, अवघ्या 80 मिनिटांत हे विमान अटलांटिक समुद्र पार करण्याएवढे सक्षम असणार आहे.
ऑस्करच्या सांगण्यानुसार हे विमान 170 प्रवासी घेऊन उड्डाण भरू शकते आणि त्याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा तिप्पट आहे. हे विमान 2486 mph वेगाने उड्डाण करू शकणाऱ्या भविष्यातील विमानाची झलक आहे. कोल्ड फ्यूजन न्यूक्लिअर रिऍक्टर सिस्टमच्या मदतीने हे तयार करण्यात आले आहे. हे विमान दोन रॅमजेट इंजिन आणि चार पुढच्या पिढीतील हायब्रिड टर्बोजेट्सद्वारे सज्ज करण्यात आहे. कॉन्कॉर्डच्या 84 फुटांच्या तुलनेत त्याचे पंख 169 फुटांचे असणार आहेत.
कॉन्कर्ड हे फ्रान्स आणि ब्रिटनने संयुक्तपणे विकसित केलेले जगातील पहिले सुपरसॉनिक विमान होते. त्याचा वेग ताशी 2179 किलोमीटर होता. आता येत असलेल्या नव्या हायपर स्टिंगबद्दल बोलायचे तर ते ताशी 4287 किलोमीटर वेगाने उडू शकणार आहे. कॉन्कर्डमुळे पर्यावरणात ध्वनिप्रदूषण प्रचंड वाढल्याचे मत अनेक तज्ञ व्यक्त करतात. मात्र या नव्या हायपरसॉनिक विमानाने पर्यावरणाला धोक्याची शक्यता नाही. ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने त्याला उडवणे हे मात्र सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे.
























































