कोण म्हणतो मी म्हातारा झालोय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा ‘वय’ हा मुद्दाच आपल्यासाठी गौण असल्याचे दाखवून दिले. पुरंदरमध्ये एका शेतकऱ्याने ‘वय झालेय, गावोगावी फिरू नका, कार्यकर्त्यांना आदेश द्या,’ असा सल्ला दिला असता शरद पवार यांनी ‘कोण म्हणतो मी म्हातारा झालोय, काय बघितलं तुम्ही? मी म्हातारा झालेलो नाही,’ अशी मिश्कील टिपणी करीत शेतकरी मेळाव्यात एकच हशा पिकवला.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी तसेच शेतकरी सन्मान मेळाव्यासाठी शरद पवार यांनी आज पुरंदरचा दौरा केला. या वेळी मेळाव्यात शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. या वेळी कार्यकर्त्याने वयाबाबत दिलेल्या सल्ल्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, मी म्हातारा झालेलो नाही. वय वाढणारच, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची भूमिका आमची आहे, मी ठामपणे त्यांच्या पाठीशी आहे. या वेळी, साहेब तुम्ही माझ्या स्वप्नात दोनदा आलात असे एका शेतकरी कार्यकर्त्याने सांगितले असता, हे स्वप्न पहाटे पडले होते की मध्यरात्री, असा सवाल त्यांनी केला असता मेळाव्यात हास्यकल्लोळ झाला.

शेतकऱ्यांची कर्जमाफी बोगस; हे तर लबाडाघरचं आवतण

भू-विकास बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, असे राज्य सरकारकडून सांगितले जाते; पण मला इथे बसलेल्या लोकांनी सांगावं की, गेल्या 10 वर्षांमध्ये किमान एका शेतकऱ्याला तरी
भू-विकास बँकेचे कर्ज मिळाले आहे का?
भू-विकास बँक अस्तित्त्वात आहे ही गोष्ट तरी तुम्हाला माहिती आहे का? भू-विकास बँक एकेकाळी होती, पण आता ती राज्यात कार्यरत नाही. आता भू-विकास बँकेचे नावही कोणाला माहिती नाही. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून
भू-विकास बँकेने दिलेल्या कर्जांची वसुलीच झालेली नाही. ही वसुली होणार नाही हे कळल्यानंतर राज्य सरकारने घोषणा केली की, आम्ही भू-विकास बँकेतील शेतकऱयांची कर्जे माफ करत आहोत. लबाडाघरचं आवतण असलं तरी जेवल्याशिवाय खरं नसतं, असा हा एकंदरीत प्रकार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.