
लातूर शहरातून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील याबाबत आपल्या मनात कोणतीही शंका नाही, असे वादग्रस्त विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते. त्यांच्या विधानानंतर लातुरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर, आता रविंद्र चव्हाण यांनी सारवासारव करत देशमुख कुटुंबाची माफी मागितली आहे.
विलासराव देशमुख यांची राजकीय संस्पृती जपणारे नेते म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. विलासरावांच्या दिलखुलास वृत्तीमुळे त्यांचे सर्व पक्षात मित्र होते; परंतु विलासरावांची मैत्री गाजली ती दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबरची. दोन्ही नेत्यांनी आपल्यातले मैत्र कधी लपवले नाही. मात्र, चव्हाण यांच्या वक्तव्याने लातूरात संतापाची लाट उसळली. लातुरात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून, लातूरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य लातुरात व्हायरल झाले आणि एकच संतापाची लाट उसळली. रवींद्र चव्हाण यांनी माफी मागावी, अशी मागणी जोर धरत होती.
अखेर रवींद्र चव्हाण यांनी माफी मागितली आहे. माझ्या विधानाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. विलासराव हे मोठे नेते होते. ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते. आपल्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत त्यांनी माफी मागितली आहे.


































































