दुष्काळ पाहिला, पण अशी अतिवृष्टी कधी बघितली नव्हती! शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता

‘मराठवाडय़ामध्ये आपण दुष्काळ पाहिला, पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. नेहमी कमी पाऊस असणाऱ्या जिह्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे. त्याचा शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱयांच्या संसारांवर प्रचंड परिणाम झालेला आहे. शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे,’ याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून, सरकारने वेगाने पंचनामे करणे आणि नुकसानभरपाई देणे या दोन गोष्टी तातडीने करणे आवश्यक असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या पुढे निर्माण झालेल्या संकटासंदर्भात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन चिंता व्यक्त केली. शरद पवार म्हणाले, ‘जिथे पाऊसपाण्याची कमतरता असते अशा जिह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचा शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱ्यांच्या संसारांवर प्रचंड परिणाम झालेला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.’

जमिनीसाठी ही मदत करावी लागेल!

‘अतिवृष्टी आणि पाऊस, तसंच पुरामुळे पीक वाहून गेलं तर त्या वर्षीचं नुकसान होतं. पण जमीन वाहून गेली तर त्या जमिनीची उत्पादकता कायमची कमी होते. त्यामुळे फक्त पिकांसाठी मदत करून चालणार नाही, जमिनीसाठीही मदत करावी लागेल,,’ असे पवार म्हणाले.