
राज्य सरकारने सोमवारी 15 सनदी अधिकाऱ्य़ांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी अभिमन्यू काळे यांची तर मुंबई महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या सीईओ पदावर महेंद्र वारभुवन यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाच्या संचालकपदी डॉ. अश्विनी जोशी यांची तर प्रवीण दराडे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळावर करण्यात आली.
राज्यातील 15 सनदी अधिकाऱ्य़ांना विविध जागांवर नियुत्त्या देताना चंद्रकांत डांगे यांची महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या संचालकपदावर, डॉ. एम. एस. कलशेट्टी यांची संचालक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे या पदावर तर पल्लवी दराडे यांची नियुक्ती सहसचिव, गृह विभाग मंत्रालय, अपील आणि सुरक्षा या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. जयश्री भोज यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ या पदावर झाली आहे. एच. पी. तुम्मोड यांची नियुक्ती आयुक्त, दुग्धविकास या रिक्त पदावर, आर बी भोसले यांची नगर जिल्हाधिकारीपदी तर डॉ. के. एच पुलकर्णी यांची मुंबई नगर परिषद संचालक पदवार नेमणूक झाली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवपदी बदली झाली आहे. कोकण विभागाचे अतिरिक्त आयुक्त आर. एस. क्षीरसागर यांची नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर नाशिक विभागाचे उपायुक्त आर. के. गावडे यांची नंदूरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक झाली आहे. रायगड जिल्हा जातपडताळणी समितीचे अध्यक्ष बी. बी. दांडगे यांची शुल्क नियंत्रण प्राधिकरणाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे.























































