12 देश खेळणार 777 क्रिकेट सामने! आयसीसीकडून पाच वर्षांचे वेळापत्रक जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी आपले पाच वर्षांसाठीचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक जाहीर केले. 2023 ते 2027 या कालावधीत 12 देशांदरम्यान क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 777 आंतरराष्ट्रीय सामने रंगणार आहेत. यामध्ये 173 कसोटी, 281 एकदिवसीय आणि 323 टी-20 सामने होणार आहेत. मागील वेळापत्रकाच्या तुलनेत नव्या वेळापत्रकात 87 सामन्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षांमध्ये क्रिकेटप्रेमींसाठी सामन्यांची मोठी मेजवानी मिळणार आहे.

30 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका

आयसीसीच्या वेळापत्रकामध्ये तब्बल 30 वर्षांनंतर हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5-5 सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. आगामी टप्प्यात उभय संघांमध्ये दोन कसोटी मालिका होणार आहेत, पण यावेळी सामन्यांची संख्या चारवरून पाच करण्यात आली आहे. म्हणजेच दोन्ही संघ आता प्रत्येक पाच-पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळतील. यातील एक मालिका 2023-24 मध्ये ऑस्ट्रेलियात होईल, तर दुसरी मालिका 2025-26 मध्ये हिंदुस्थानात होईल. ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त हिंदुस्थान आणि इंग्लंडदरम्यानही पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटांची मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल.

एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक वाढ

मागील वेळापत्रकाच्या तुलनेत नव्या वेळापत्रकात सामन्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यंदा 22 कसोटी, 40 एकदिवसीय व 25 टी-20 सामन्यांची वाढ करण्यात आली आहे. यात एकदिवसीय सामन्यांची संख्या सर्वाधिक वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयसीसीने घेतला. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार पुढील पाच वर्षांत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थान हे देश सर्वाधिक कसोटी सामने खेळतील. यामध्ये इंग्लंड एकूण 22 सामने खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थान अनुक्रमे 21 आणि 20 कसोटी सामने खेळणार आहेत.

हिंदुस्थानमध्ये होणार दोन विश्वचषक
आयसीसीच्या पाच वर्षांच्या वेळापत्रकानुसार हिंदुस्थानमध्ये दोन विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. पुढील वर्षी हिंदुस्थानात होणाऱया एकदिवसीय विश्वचषकापासून याची सुरुवात होईल. त्यानंतर 2014 मध्ये वेस्ट इंडीज आणि अमेरिका संयुक्तपणे टी-20 विश्वचषकाचे आयोजन करतील. पाकिस्तानकडे 2025 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद देण्यात आले आहे. 2026 मध्ये हिंदुस्थान आणि श्रीलंका संयुक्तपणे टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे तीन देश संयुक्तपणे विश्वचषक स्पर्धेचे आयोजित करणार आहेत.