
वर्ल्ड कपचं तिकीट अवघ्या 100 रुपयांत मिळणार आहे. कुणाचं यावर विश्वास बसत नसला तरी आयसीसीने महिला क्रिकेटच्या लोकप्रियतेसाठी हे पाऊल उचलले आहे. येत्या 30 सप्टेंबरपासून हिंदुस्थानात आयसीसी महिला वर्ल्ड कपचा थरार रंगणार असून या स्पर्धेला क्रिकेट चाहत्यांचेही प्रेम लाभावे म्हणून आयसीसीने अवघ्या 100 रुपयांत सामन्यांची तिकीटे उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना यजमान हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यात 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे खेळविला जाणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच आयसीसीने महिला वर्ल्ड कपवर छप्पर फाडके बक्षीसांचा वर्षाव केला होता. सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची रोख बक्षीसे या स्पर्धेत वितरित केली जाणार आहेत. या श्रीमंत स्पर्धेला प्रेक्षकांचीही श्रीमंती लाभावी म्हणून आयसीसीने फक्त 100 रुपये किमतीची तिकीटे सामान्य चाहत्यांसाठी उपलब्ध केली आहेत. महिला क्रिकेटला अद्याप क्रिकेटप्रेमींची गर्दी लाभत नसली तरी या स्पर्धेच्या माध्यमातून पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेट पाहायलाही क्रिकेटप्रेमी स्टेडियम गाठतील, असा विश्वास आयसीसीने व्यक्त केला आहे. पहिल्या टप्प्यात हिंदुस्थानात खेळवल्या जाणाऱ्या साखळी फेरीतील सर्व सामन्यांच्या तिकिटांची किंमत फक्त 100 रुपये असेल. महिला क्रिकेटचा प्रचार करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, खेळाडूंचा उत्साह वाढवणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. याशिवाय गुगल पे खास प्री-सेल तिकिटांच्या माध्यमातून चाहत्यांना आकर्षित करेल. तिकिटांची विक्री मंगळवार, 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला विख्यात गायिका श्रेया घोषालचा सांगितिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
जागतिक स्तरावर महिला क्रिकेटचे महत्त्व वाढवण्यासाठी श्रेया घोषाल लाईव्ह परफॉर्मन्स सादर करेल. आगामी विश्वचषक तब्बल 12 वर्षांनंतर हिंदुस्थानात होत आहे. आपल्या घरच्या मैदानावर विश्वविजेता होण्यासाठी हरमनप्रीत काwरच्या नेतृत्वातील हिंदुस्थानी संघ सज्ज झाला आहे. विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्यासाठी आठ संघ मैदानात असणार आहेत.