
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयोजिलेल्या आगळ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला येत्या 1 ऑगस्टपासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांतील ऍशेस मालिकेपासून सुरुवात होणार आहे. जून 2021 पर्यंत चालणाऱ्या या आगळ्या स्पर्धेची अंतिम लढत जून 2021 मध्ये क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱया लंडनच्या लॉर्डस् मैदानावर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील द्विपक्षीय कसोटी मालिका किमान दोन आणि कमाल पाच लढतींच्या असतील.एखाद्या संघास एका मालिकेतून सर्वाधिक 120 गुण मिळवता येतील.
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा बंद केल्यानंतर 2010 साली जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा खेळवण्याचा विचार सुरू केला होता, पण काही सदस्य देशांच्या विरोधानंतर या स्पर्धेच्या आयोजनाचा विचार मागे पडला होता. पण 2017 मध्ये आयसीसीने या आगळ्या स्पर्धेच्या आयोजनाबाबत ठाम निर्णय घेतला.
आयसीसी वर्ल्ड कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा कार्यक्रम
हिंदुस्थान – 18 कसोटी
जुलै-ऑगस्ट 2019 – 2 कसोटी वि. वेस्ट इंडीज (विदेशी दौरा).
ऑक्टोबर -नोव्हेंबर 2019 – 3 कसोटी वि. दक्षिण आफ्रिका (मायदेशातील मालिका).
नोव्हेंबर 2019 – 2 कसोटी वि. बांगलादेश (मायदेशातील मालिका).
फेब्रुवारी 2020 – 2 कसोटी वि. न्यूझीलंड (विदेशी दौरा).
डिसेंबर 2020 – 4 कसोटी वि. ऑस्ट्रेलिया (विदेशी दौरा)
जानेवारी-फेब्रुवारी 2021 – 5 कसोटी वि. इंग्लंड (मायदेशातील मालिका).
किती संघ, कसे असेल स्पर्धेचे स्वरूप
आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत कसोटी दर्जा मिळालेले नऊ संघ सहभागी होतील. हिंदुस्थान, इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे नऊ संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. स्पर्धेत सहभागी सर्व नऊ संघांना सहा संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळाव्या लागणार आहेत. त्यातील तीन मायदेशी तर तीन परदेशात खेळवल्या जातील. स्पर्धेत 27 कसोटी मालिका आणि 71 कसोटी लढती खेळवल्या जाणार आहेत. साखळी फेरीत टॉपवर राहणाऱया दोन संघांत जून 2021 मध्ये अंतिम लढत लॉर्डस् मैदानावर खेळवली जाईल. दोन कसोटींच्या मालिकेत प्रत्येक विजयाला 60, टायसाठी 30, बरोबरीची 20; तीन कसोटींच्या मालिकेत प्रत्येक विजयासाठी 40, टायसाठी 20 तर बरोबरीसाठी 13.3; चार कसोटींच्या मालिकेत प्रत्येक विजयाला 30, टायला 15, बरोबरीसाठी 10 अशी अंकांची विभागणी असेल. तर पाच कसोटींच्या मालिकेत प्रत्येक विजयाला 24, टायला 12 आणि बरोबरीसाठी 8 गुण दिले जाणार आहेत.























































