वर्ल्डकप इतिहासाची सफर – कसा होता 1975 चा पहिला वर्ल्डकप?

93

सामना ऑनलाईन । मुंबई

इंग्लंडमध्ये 30 मे पासून आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे. आयसीसीचा हा 12 वा वर्ल्डकप असून एकूण 10 संघ यंदा सहभागी होणार आहेत. यंदाचा वर्ल्डकप हा 1992 प्रमाणेच राऊंड रॉबिन पद्धतीने खेळला जाणार आहे.

क्रिकेट वर्ल्डकपचा इतिहासही रंजक असाच आहे. कारण आता जरी वर्ल्डकप 50 षटकांचा असला, रंगीबेरंगी कपडे घालून खेळला जात असला तरी सुरुवातीच्या काळात वर्ल्डकप 60 षटकांचा आणि खेळाड़ू पांढऱ्या कपड्यामध्ये खेळत होते.

iccwc1975

आयसीसीचा पहिला वर्ल्डकप इंग्लंडमध्ये 7 जून, 1975 ते 21 जून 1975 या कालावधीमध्ये रंगला होता. या वर्ल्डकमध्ये एकूण 8 संघ सहभागी झाले होते. यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडीज, हिंदुस्थान, पाकिस्तान, न्यूझीलँड, श्रीलंका व पूर्व आफ्रिका हे संघांचा समावेश होता. प्रुडेनशियल कंपनीने या स्पर्धेला प्रायोजकत्व दिल्याने पहिला वर्ल्डकप ‘प्रुडेनशियल वर्ल्डकप’ म्हणून ओळखला जातो.

दोन गटात विभागणी
पहिल्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या आठ संघाची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली होती. पहिला ‘अ गट’ आणि दुसरा ‘ब गट’. अ गटात हिंदुस्थान, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पूर्व आफ्रिका हे संघ होते, तर ब गटामध्ये वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ होते. प्रत्येक संघाला आपल्या गटातील संघासोबत सामना खेळायचा होता आणि पहिले दोन संघ उपांत्यफेरीत प्रवेश करणार होते. अ गटामधून इंग्लंड, न्यूझीलंड हे संघ, तर ब गटातून वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्यफेरीत गेले.

हिंदुस्थानची कामगिरी
अ गटामध्ये असणाऱ्या हिंदुस्थानची पहिल्या वर्ल्डकपमधील कामगिरी यथातथाच होती. हिंदुस्थाला इंग्लंड आणि न्यूझीलंडकडून पराभव सहन करावा लागला, तर पूर्व आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला. पहिल्या राऊंडमधून हिंदुस्थानला गाशा गुंडाळावा लागला होता. पहिल्या वर्ल्डकपमध्ये श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांनी हिंदुस्थानचे नेतृत्व केले होते.

वेस्ट इंडिजचा वर्ल्डकपवर कब्जा
आयसीसीच्या पहिल्या वर्ल्डकपचा अंतिम सामना 21 जून रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 60 षटकामध्ये 291 धावा चोपल्या. वेल्ड इंडिजकडून क्लाईव्ह लॉयडने दमदार शतक ठोकत नाबाद 102 धावे केल्या, तर रोहन कन्हाईने 55 धावांची खेळी साकारली. त्यानंतर धारधार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा डाव 274 धावांवर गारद करत 17 धावांनी विजय मिळवला आणि पहिला वर्ल्डकप जिंकला. नाबाद 102 धावा करणाऱ्या लॉयड यांना सामनावीरचा किताब देण्यात आला होता. पहिल्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडच्या ग्लेन टर्नर याने सर्वाधिक 333 धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाच्या गॅरी गिलमाऊरने सर्वाधिक 11 बळी घेतले होते.

आपली प्रतिक्रिया द्या