ICC T – 20 World Cup – हिंदुस्थानातच सामन्यांसाठी ठिकाण शोधा; ICC बांगलादेशच्या सामन्यांसाठी शोधणार पर्याय

टी-२० विश्वचषक सुरू होण्यास तीन आठवडे शिल्लक असताना बांगलादेशचा संघ त्यांचे सामने कुठे खेळेल याबाबत अजूनही संभ्रमाची स्थिती आहे. सुरक्षा आणि राजकीय कारणांमुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) त्यांचे सर्व सामने हिंदुस्थानऐवजी श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली आहे. आयसीसी शेवटच्या क्षणी सामन्यांचे ठिकाण बदलण्याच्या बाजूने नाही. आता आयसीसी बांगलादेशच्या सामन्यांसाठी हिंदुस्थानातच सामन्यासाठी ठिकाण शोधण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे या सामन्यांबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे.

हिंदुस्थानात सुरक्षा आणि राजकीय तणावाचा हवाला देत, BCB ने अलीकडेच ICC ला पत्रे पाठवत बांगलादेशचे सर्व गट सामने हिंदुस्थानऐवजी श्रीलंकेत खेळवण्याची विनंती केली आहे. मात्र, सामन्याचे ठिकाण बदलण्याबाबत ICC सकारात्मक नाही. स्पर्धा खूप जवळ आली आहे आणि शेवटच्या क्षणी स्थळ बदलल्याने केवळ प्रसारण नियोजनात व्यत्यय येणार नाही तर तिकीट, मैदान व्यवस्थापन आणि प्रवास तयारीवरही गंभीर परिणाम होईल, असे आयसीसीचे मत आहे.

क्रिकबझने वृत्त दिले आहे की, आयसीसीने श्रीलंकेच्या पर्यायाला प्राधान्य दिलेले नाही. मात्र, बीसीसीआयच्या सहकार्याने हिंदुस्थानात पर्यायी शहरे शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. चेन्नई आणि तिरुवनंतपुरम हे बॅकअप पर्याय म्हणून विचारात घेतले जात आहेत. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए) आणि केरळ क्रिकेट असोसिएशन (केसीए) यांना गरज पडल्यास सामने आयोजित करण्याच्या स्थितीत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमने आधीच सात विश्वचषक सामने आयोजित केले आहेत आणि टीएनसीए अधिकाऱ्यांनी आयसीसीला आश्वासन दिले आहे की आठ खेळपट्ट्या उपलब्ध असल्याने अतिरिक्त सामने सामावून घेणे कठीण होणार नाही.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी या वादात उडी घेत आयसीसीला प्रस्ताव दिला आहे की जर हिंदुस्थान आणि श्रीलंका दोन्ही ठिकाणे स्वीकारार्ह नसतील तर पाकिस्तान बांगलादेशचे सामने आयोजित करण्यास तयार असेल. मात्र, आयसीसीने या प्रस्तावावर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. सामन्यांच्या वेळापत्रकानुसार, बांगलादेश ७, ९ आणि १४ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे वेस्ट इंडिज, इटली आणि इंग्लंडविरुद्ध आणि १७ फेब्रुवारी रोजी मुंबईत नेपाळविरुद्ध खेळणार आहे. तथापि, सध्याच्या परिस्थितीमुळे हे वेळापत्रक अनिश्चिततेत अडकले आहे.