आयसीसीच्या नव्या नियमाचा हिंदुस्थानला फटका, सर्वाधिक गुण असूनही दुसऱया स्थानावर घसरण

आयसीसीच्या नव्या नियमाचा हिंदुस्थानी क्रिकेट संघाला फटका बसला आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून बहुतांशी नियोजित क्रिकेट मालिका पार पडलेल्या नाहीत. याचे पडसाद पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवरही उमटले आहेत. या कालावधीत न झालेल्या मालिका व गुण कशा प्रकारे देता येतील यासाठी आयसीसीकडून प्रयत्न करण्यात आले. याअंतर्गत आयसीसीच्या क्रिकेट समितीने नव्या नियमाचा अवलंब केला. मात्र याचा फटका हिंदुस्थानी क्रिकेट संघाला बसला. आतापर्यंत सर्वाधिक 360 गुण मिळवल्यानंतरही हिंदुस्थानचा संघ गुणतालिकेत दुसऱया स्थानावर फेकला गेला आहे. ऑस्ट्रेलियन संघ 296 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

 जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपची ताजा गुणतालिका

ऑस्ट्रेलिया      –    296 गुण   (82.2 टक्के)

हिंदुस्थान       –    360 गुण   (75 टक्के)

इंग्लंड            –    292 गुण   (60.8 टक्के)

न्यूझीलंड        –    180 गुण   (50 टक्के)

पाकिस्तान      –    166 गुण   (39.6 टक्के)

श्रीलंका          –    80 गुण     (33.3 टक्के)

वेस्ट इंडीज     –    40 गुण     (16.7 टक्के)

दक्षिण आफ्रिका    –    24 गुण      (10 गुण)

बांगलादेश      –    0 गुण       (0.0 टक्के)

परसेण्टेज ऑफ पॉइंटस् म्हणजे काय

आयसीसीच्या क्रिकेट समितीने परसेण्टेज ऑफ पॉइंटस् या नव्या नियमावलीचा यावेळी अवलंब केला. एखादा संघ एपूण किती गुणांसाठी लढती खेळतो आणि त्या संघाला किती गुण प्राप्त होतात याला म्हणतात परसेण्टेज ऑफ पॉइंटस्. यानुसार नऊ संघांचे क्रमांक देण्यात आले आहेत.

टीम इंडियाची घसरण कशी

टीम इंडियाने आतापर्यंत चार कसोटी मालिका खेळलेल्या आहेत. यामधील तीनमध्ये विजय मिळवण्यातही त्यांना यश लाभले आहे. नऊपैकी सात लढती या संघाने जिंकलेल्या आहेत. दोनच लढतींमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र टीम इंडियाचा संघ 480 गुणांसाठी मैदानात उतरला आणि त्यांना मिळाले 360 गुण. याची टक्केवारी होते 75. या कारणामुळे टीम इंडियाची पहिल्या स्थानावरून दुसऱया स्थानावर घसरण झाली आहे.

सर्वोत्तम दोन संघ जून महिन्यात फायनल खेळणार

आयसीसीच्या गुणतालिकेतील सर्वोत्तम दोन संघ पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळणार आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया व हिंदुस्थान हे दोन संघ अव्वल दोन स्थानावर आहेत. 2021 सालामधील जून महिन्यात इंग्लंडमधील लॉर्डस् येथे या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या