
आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटच्या जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत झिम्बाब्वेच्या अष्टपैलू सिकंदर रझाने मोठी झेप घेतली आहे. श्रीलंकेतील मालिकेतील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर रझा अष्टपैलू खेळाडूंच्या गटात अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. कारकिर्दीत प्रथमच त्याने नंबर वनचा ताज पटकावलाय. सिकंदर रझाने 302 गुण मिळवत दोन स्थानांच्या सुधारणेसह नंबर वन होण्याचा मान पटकावला आहे. सध्या श्रीलंकेचा संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. हरारेच्या मैदानात झालेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये सिकंदरने फलंदाजीसह गोलंदाजीत छाप पाडली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 87 चेंडूंत 92 धावांची खेळी केली होती. याशिवाय 10 षटकांत 48 धावा देत एक विकेट टिपला. दुसऱ्या सामन्यात त्याने 55 चेंडूंत नाबाद 59 धावांची खेळी केली.