हिंदुस्थानमध्ये सुरक्षेला धोका नाही, वर्ल्डकप सामन्यांचे स्थळ बदलणार नाही: बांगलादेशची मागणी ICC ने फेटाळली

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) हिंदुस्थानमध्ये बांगलादेश संघाच्या सुरक्षेबाबत कोणतेही विश्वसनीय किंवा ठोस सुरक्षा धोके नसल्याचे स्पष्ट केले असून, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) केलेली वर्ल्डकप सामन्यांचे स्थळ बदलण्याची मागणी फेटाळली आहे.

क्रीकबझच्या वृत्तानुसार, 6 जानेवारी रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत ICC अधिकाऱ्यांनी BCB प्रतिनिधींना सांगितले की, त्यांच्या आकलनानुसार हिंदुस्थानात सामने खेळताना बांगलादेश संघाला कोणताही विशिष्ट धोका नाही. त्यामुळे T20 विश्वचषकाच्या वेळापत्रकात किंवा स्थळांत बदल करण्याची गरज नाही. या बैठकीपूर्वी 4 जानेवारीला BCB ची आपत्कालीन बैठक झाली होती आणि त्यानंतर ICC कडे अधिकृत पत्र पाठवून सामने हिंदुस्थानबाहेर हलवण्याची विनंती करण्यात आली होती. याबाबत अंतिम लिखित निर्णय 10 जानेवारीपर्यंत अपेक्षित आहे.

दरम्यान, बांगलादेश संघाचे गट–C मधील तीन सामने कोलकात्यात होणार आहेत. यातील पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीज, दुसरा सामना 9 फेब्रुवारी रोजी इटली आणि तिसरा सामना 14 फेब्रुवारी रोजी इंग्लंड संघाशी होणार आहे. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत नेपाळविरुद्ध सामना आहे.

खेळा, नाहीतर गुण गमवा

ICC ने सामने इतरत्र हलविण्याची मागणी थेट नाकारत बांगलादेशाला हिंदुस्थानात येऊन सामने खेळावे लागतील, अन्यथा गुण गमावण्याचा धोका राहील असे म्हटले आहे. याबाबत माध्यमांनी वृत्त दिले आहे. मात्र BCB ने असा कोणताही अंतिम इशारा मिळाल्याचे नाकारले आहे. ICC आणि BCCI यांनी अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.