धोनीप्रमाणे मोठे षटकार ठोकून सामना संपवायला आवडेल! इंग्लंडविरुद्ध थरारक पराभवानंतर नेपाळच्या खेळाडूचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्डकपमध्ये वानखेडे मैदानावर रविवारी झालेल्या सामन्यात नेपाळला इंग्लंडकडून अवघ्या 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतरही नेपाळचा खेळाडू नंदन यादव माध्यमांशी संवाद साधला. या सामन्यातून संघाने महत्त्वाचे धडे घेतल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, त्याने यावेळी हिंदुस्थानला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आवर्जून उल्लेख केला.

सामन्यानंतरच्या झालेल्या पत्रकार परिषदेत ‘दैनिक सामना’चे प्रतिनिधी गणेश पुराणिक यांनी नंदनला संघाच्या कामगिरीबद्दल आणि यातून काय शिकलात याबाबत प्रश्न विचारला. आम्ही या सामन्यातून बरेच काही शिकलो आहोत. आम्हाला महेंद्रसिंह धोनीप्रमाणे मोठे षटकार ठोकून सामना संपवायला आवडेल, असे नंदन म्हणाला.

शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत नेपाळला अखेरच्या 6 चेंडूत 10 धावांची गरज होती. नेपाळने ‘धोनी स्टाईल’ने सामना संपवण्याचा नेपाळचा प्रयत्न होता, मात्र इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करनने अचूक गोलंदाजी करत केवळ 5 धावा दिल्या आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला.

दरम्यान, नेपाळच्या या झुंजार कामगिरीवर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन प्रचंड प्रभावित झाला आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “नेपाळ, जर तुम्हाला कधी गरज भासली तर मी माझ्या सेवा देण्यासाठी (प्रशिक्षण) तयार आहे! तुमची प्रगती अशीच सुरू राहू दे! याबद्दल विचारले असता नंदन म्हणाला, “एका महान खेळाडूने असे ट्विट करणे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण हा व्यवस्थापनाचा निर्णय असतो, त्यामुळे आम्ही थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही. यावर काय बोलावे हे मला सुचत नाहीये.

नंदन यादव पुढे, आम्हाला या कामगिरीचा अभिमानही वाटतोय आणि विजयाजवळ येऊन हरल्याचे दुःखही आहे. इंग्लंडसारख्या मोठ्या संघाला आम्ही कडवी झुंज दिली, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.