ICC T20 WC 2026 – सुपर 8 साठी विंडिजचे सैनिक सज्ज; झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीपूर्वी प्रशिक्षक डॅरेन सामी यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी टी-20 वर्ल्डकपचा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. साखळी फेरीत अपराजित राहिलेल्या वेस्ट इंडिजचा संघ सुपर 8 च्या आव्हानासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. सोमवारी मुंबईतील वानखेडे मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिज संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी आपली रणनीती स्पष्ट केली. आमचा कोणताही खेळाडू जखमी नाही, माझे सर्व सैनिक युद्धासाठी तयार आहेत, अशा शब्दांत त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला कडक इशारा दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना डॅरेन सॅमी यांनी स्पष्ट केले की, वर्ल्डकपसारख्या मोठ्या मंचावर कोणताही संघ कमकुवत नसतो. उद्या आम्ही झिम्बाब्वेविरुद्ध तितक्याच गांभीर्याने मैदानात उतरू, जसे आम्ही हिंदुस्थान किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतो. टी-20 फॉरमॅटमध्ये एका चुकीची किंमत पराभवाने मोजावी लागते, त्यामुळे अंमलबजावणीवर आमचा भर असेल, असे त्यांनी नमूद केले.

सिकंदर रझाच्या नेतृत्वाचे कौतुक

झिम्बाब्वेने सुपर 8 मध्ये मारलेली धडक ही त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे डॅरेन सॅमी यांनी मान्य केले. विशेषतः कर्णधार सिकंदर रझाच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेचा आत्मविश्वास उंचावला आहे. ज्या दिवशी तुमची रणनीती चुकते, त्या दिवशी प्रतिस्पर्धी वरचढ ठरतो. त्यामुळे आम्ही गाफील राहणार नाही, असे सूचक विधान त्यांनी केले.

शाई होप आणि पॉवेलच्या फलंदाजीचे समर्थन

संघातील फलंदाजांच्या कामगिरीवर भाष्य करताना त्यांनी शाई होपच्या शैलीचा बचाव केला. छतावरचा षटकार असो किंवा स्टँडमधला, धावा सहाच मिळतात. शाई होपचा स्ट्राईक रेट अनेक बड्या हिटर्सपेक्षा सरस आहे. निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल देखील आपल्या भूमिकेत चपखल बसले आहेत, असे डॅरेन सॅमी म्हणाले.

काहीतरी विशेष करून दाखवण्याचा निर्धार

बऱ्याच वर्षांनंतर वेस्ट इंडिजचे सर्व प्रमुख खेळाडू एकत्र आणि तंदुरुस्त आहेत. हीच संघाची सर्वात मोठी ताकद ठरत आहे. मुलांना स्वतःवर विश्वास आहे की या विश्वचषकात आपण काहीतरी विशेष साध्य करू शकतो, असा आशावादही डॅरेन सॅमी यांनी व्यक्त केला.