
मी वारंवार सांगत आलोय की, क्रिकेटचा सामना असो अथवा कोणताही खेळ मित्रांसोबत खेळला जातो शत्रूसोबत नाही. शत्रूसोबत खेळ खेळला जात नाही, रक्ताची होळी खेळली जाते, अशा शब्दांत काँग्रेसने रविवारी होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शवला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.
काँग्रेसचे राशीद अल्वी यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर भाष्य करत सामन्याला विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले की, “हिंदुस्थान-पाकिस्तान सामना खेळणं दुर्दैवी आहे. एकीकडे ते लोक आपल्या देशात येऊन दहशतवाद पसरवत आहेत, त्यांच्यासोबत आपली लढाई होते. दुसरीकडे तुम्ही क्रिकेटचा सामना खेळत आहात. मी वारंवार सांगत आलोय की, क्रिकेटचा सामना असो अथवा कोणताही खेळ मित्रांसोबत खेळला जातो शत्रूसोबत नाही. शत्रूंसोबत खेळ खेळला जात नाही, रक्ताची होळी खेळली जाते.”
कुठे ना कुठे प्रधानमंत्र्यांचा पाकिस्तानसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे. जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं, त्यामध्ये कोणताही दहशतवादी मारला गेला नाही. फक्त काही इमारतींचं नुकसान झालं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की, पाकिस्तानने आपले पाच ते सहा जेट पाडले. आपलं राफेल पाडलं. आजपर्यंत प्रधानमंत्री आणि हे सरकार सांगू शकलेलं नाही की, ही बातमी खरी आहे का खोटी? असा सवाल राशीद अल्वी यांनी उपस्थित केला आहे.
#WATCH | Delhi | On India vs Pakistan #ICCT20WorldCup, Congress leader Rashid Alvi says, “This is unfortunate. On one hand, they come and spread terror in our country, there is a war going on with them and on the other hand, you are playing a cricket match with them. Any game is… pic.twitter.com/gubggqhi5D
— ANI (@ANI) February 14, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांच्यातील संबंधांवरही राशीद अल्वी यांनी टीकास्त्र सोडलं. “प्रधानंत्री पंतप्रधान मोदींचे नवाज शरीफसोबत खूप जवळचे संबंध आहेत. नवाज शरीफने एकदाही ऑपरेशन सिंदूरमध्ये ना हिंदुस्थानचा विरोध केला ना पंतप्रधानांना विरोध केला,” असे राशीद अल्वी म्हणाले आहेत.



























































