
वेस्ट इंडीजने सोमवारी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या सुपर-8 फेरीतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेला तब्बल 107 धावांनी पराभूत केले. या विजयामुळे हिंदुस्थानची सेमी फायनलची वाट बिकट झाली आहे. कारण यजमान हिंदुस्थानलाही पहिल्या सुपर-8 लढतीत दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. गटातील अव्वल दोन संघांनाच उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार असल्याने आता हिंदुस्थानची धाकधूक वाढली आहे.
हिंदुस्थानने दोन्ही सामने जिंकले तर..
हिंदुस्थानने उर्वरित सुपर-8 लढतीत वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांवर विजय मिळविला, तर त्याचे चार गुण होतील. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. मात्र हिंदुस्थानने दोन्ही सामने जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेने एक सामना गमावला, तर तीन संघ चार-चार गुणांवर बरोबरीत येऊ शकतात. अशा परिस्थितीत नेट रनरेट निर्णायक ठरेल. त्यामुळे हिंदुस्थानला केवळ विजय नव्हे, तर मोठय़ा फरकाने विजय मिळवणे अत्यावश्यक आहे. जर टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेने दोन्ही सामने गमावले, तर हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज हे संघ उपांत्य फेरीत दाखल होतील.
हिंदुस्थानने एकच सामना जिंकला तर…
सुपर-8 फेरीतील फक्त एका विजयासह हिंदुस्थानचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास अशक्य होईल. इतर निकाल कसेही लागले, तरी हिंदुस्थानचे गणित फारच कठीण बनेल. टीम इंडियाचा पुढील सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे, तर 1 मार्चला वेस्ट इंडीजशी लढत होईल. वेस्ट इंडीजचे फलंदाज आणि गोलंदाज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्यांनी आतापर्यंत खेळलेले सर्व पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांना रोखणे हिंदुस्थानसाठी नक्कीच सोपे नसेल.
दक्षिण आफ्रिकेची स्थिती मजबूत
दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानवर विजय मिळवत दमदार सुरुवात केली आहे. आता त्यांचे सामने वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वेविरुद्ध आहेत. उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल. एपंदरीत, हिंदुस्थानसाठी पुढील दोन्ही सामने ‘करो या मरो’चे ठरणार असून मोठय़ा फरकाने विजय मिळवणे हीच सेमी फायनलकडे जाण्याची किल्ली ठरणार आहे.































































