ऑस्ट्रेलियाचा हिंदुस्थानला धक्का, कसोटी क्रमवारीत पटकावले अव्वल स्थान

2178
australian team black armbands

ICC जागतिक कसोटी क्रिकेट क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानला जबरदस्त धक्का देत पहिलं स्थान पटाकवलं आहे. हिंदुस्थान या क्रमवारीत थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय. शुक्रवारी ICC ने नवीन क्रमवारी घोषित केली. ऑक्टोबर 2016 नंतर ही पहिली वेळ आहे जेव्हा हिंदुस्थानी संघाची पहिल्या नंबरची खुर्ची हिसकावून घेण्यात इतर संघ यशस्वी झाला आहे. मात्र दिलासा देणारी बातमी ही आहे की आयसीसीच्याच जागतिक कसोटी चॅम्पिअनशिप गुणतालिकेमध्ये हिंदुस्थानी संघ हा अव्वल स्थानावर आहे. या चॅम्पिअनशिपमध्ये 9 संघ सामील असून यातील सगळे संघ 6 कसोटी सामने खेळतील. गुणतालिकेच्या आधारावर पहिल्या 2 संघांमध्ये अंतिम कसोटी सामना होईल. हा सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डसवर होईल.

हिंदुस्थानी संघाला हा धक्का बसण्यामागे महत्वाचं कारण हे आहे की आयसीसीने 2016-2017 या वर्षातील रेकॉर्डवगळण्याचा निर्णय घेतला होता. या वर्षामध्ये हिंदुस्थानी संघाने पाचही कसोटी मालिका जिंकल्या होत्या. या मालिकांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरोधातील मालिकेचाही समावेश होता. याच काळात ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेकडूनही पराभवाचा सामना करावा लागला होता. 2016-17 मध्ये हिंदुस्थानी संघाने 12 कसोटी सामने जिंकले होते. या संघाला फक्त एकाच कसोटी सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले होते.

कसोटी क्रमवारीमध्ये मे 2019 मध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यांपैकी 100 टक्के सामने आणि 2018 सालच्या 50 टक्के सामन्यांना ग्राह्य धरण्यात आले आहे. यानुसार ऑस्ट्रेलिया आता T20 सह कसोटी सामन्यांसाठीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा संघ एक दिवसीय सामन्यांसाठीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या