ICC Test Ranking – विराटचे स्थान कायम; वोक्स, मसूदची हनुमान उडी

1070

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी लढतीचा निकाल लागल्यानंतर आयसीसीने कसोटीची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नंबर-2 वर कायम आहे. तर इंग्लंडचा क्रिस वोक्स आणि पाकिस्तानचा शान मसूद याने हनुमान उडी घेतली आहे.

फलंदाजांच्या यातील ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ पहिल्या, विराट कोहली दुसऱ्या तर न्यूझीलंडचा केन विलीयम्सन तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या 10 खेळाडुत पुजारा आठव्या आणि रहाणे दहाव्या स्थानावर कायम आहेत. पाकिस्तानचा बाबर आझम सहाव्या आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूट नवव्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान विरुद्ध कसोटीत शून्य आणि नऊ धावा करणारा स्टोक्स चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरला आहे.

दरम्यान, या कसोटीत पहिल्या डावात 156 धावांची खेळी करणारा डावखुरा फलंदाज शान मसूद 14 स्थानांची उडी घेऊन कारकिर्दीतील सर्वोच्च 19 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर इंग्लंडला विजय मिळवून देणारा, दुसऱ्या डावात नाबाद 86 धावा करणारा क्रिस वोक्स 18 स्थानांची उडी घेऊन 78 व्या स्थानावर पोहोचला.

लढतीत 8 बळी घेणारा पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासीर शाह 22 व्या तर शादाब कारकिर्दीतील सर्वोच्च 69 व्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड तिसऱ्या स्थानावर कायम आहे. हिंदुस्थानचा बुमराह आठव्या स्थानावर कायम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या