World Cup 2019 आजपासून क्रिकेटच्या ‘रनोत्सवा’ला सुरुवात

सामना प्रतिनिधी । लंडन

हिंदुस्थानी चाहत्यांसह जगभरातील कोट्यवधी क्रिकेटशौकिनांचे लक्ष लागलेला विराट कोहलीचा हिंदुस्थानी संघ आजपासून इंग्लंडमध्ये सुरू होणार्‍या 12 व्या आयसीसी विश्वचषकाच्या जेतेपदासाठी फेव्हरिट मानला जात आहे. कर्णधार विराटच्या जेतेपदप्राप्तीच्या महत्त्वाकांक्षेला यंदा निलंबनानंतर संघात परतलेला धडाकेबाज ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीवन स्मिथचा निर्धार आणि तुफान फॉर्मात असलेल्या यजमान इंग्लंड संघाचा कर्णधार इयान मॉर्गन याचा दृढविश्वासाचा जोरदार मुकाबला करावा लागणार आहे. उद्या, 30 मेपासून क्रिकेटच्या या रनोत्सवाला म्हणजेच क्रिकेटच्या महाकुंभमेळय़ाला सुरुवात होणार आहे. त्यातच सातत्यपूर्ण खेळ करणारा न्यूझीलंड आणि तुफानी फलंदाजांचा भरणा असलेला वेस्ट इंडीज संघ हे यंदाच्या स्पर्धेतील ‘डार्क हॉर्से’स मानले जात आहेत. दक्षिण आफ्रिका संघही बलवान गणला जात आहे. त्यामुळे विराट अपेक्षांचे ओझे असलेल्या टीम इंडियाची इंग्लंडमध्ये मोठी कसोटी लागणार हे निश्चित.

2011 च्या विश्वचषक विजेतेपदानंतर क्रिकेट जगतात हिंदुस्थानी संघाचा दबदबा प्रचंड वाढला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीत विक्रमांची नवनवी शिखरे पादाक्रांत करीत आहे. तर यॉर्करतज्ञ म्हणून ओळखला जाणारा जसप्रीत बुमराहची मोठी दहशत जगातील भल्याभल्या फलंदाजांना वाटते.  

स्मिथ, वॉर्नर ठरणार कांगारूंचे तारणहार

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्हन स्मिथ आणि धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांची बॅट तळपणे ऑस्ट्रेलियन संघासाठी लाभदायक ठरणार आहे. या दोघांनीही आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी साकारल्याने ऑस्ट्रेलियन संघासाठी ते तारणहार ठरू शकतात. कर्णधार ऍरॉन फिंच यानेही स्मिथ आणि वॉर्नरच्या पुनरागमनने आपला संघ अधिक बलवान झाल्याचे प्रतिपादन केले आहे. यंदा या स्पर्धेत सहभागी प्रत्येक 10 संघांना साखळीत एकमेकांविरुद्ध खेळावे लागणार आहे. त्यामुळे कांगारूंसह सर्वच प्रमुख संघांना बाद फेरीत पोहचण्यासाठी किमान सहा साखळी लढती जिंकणे आवश्यक ठरणार आहे. माजी विजेता ऑस्ट्रेलिया संघ यंदा उपांत्य फेरी गाठणार हे त्यामुळे निश्चित झाले आहे.  

यजमानांना 44 वर्षांची आस संपवायचीय

क्रिकेटचे जनक मानल्या जाणार्‍या इंग्लंडला गेल्या 40 वर्षांत क्रिकेटचा विश्वचषक जिंकता आलेला नाही.पण यंदाचा कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ त्यांच्या अन्य संघांपेक्षा अधिक निर्धाराने खेळणारा आणि बलाढय़ आव्हानांना सामोरे जाऊन सातत्यपूर्ण कामगिरी करणारा वाटतोय. त्यामुळे विजयाच्या दृढनिर्धाराने खेळणारा यजमान इंग्लंड संघ मायदेशातील या विश्वचषकात नवा इतिहास घडविण्याची किमया साधू शकेल असे बहुतांश क्रिकेटशौकिनांना वाटत आहे. कर्णधार मॉर्गनच्या साथीला सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा जोस बटलर, जॉनी बेयरस्टो, जो रूट हे फलंदाजही इंग्लंडला अपेक्षित यश मिळवून देऊ शकतात. त्यातच घरचे वातावरण यजमान इंग्लंडला अनुकूल ठरणार आहे.

आजची शुभारंभी लढत

इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका, दि ओव्हल, लंडन, दुपारी 2.30 पासून