पालकांच्या भांडणात कॉलर धरल्याने गुदमरून एकाचा मृत्यू, इचलकरंजीत मुलांच्या वादातून झाली हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इचलकरंजी शहराच्या कोले मळा नावाच्या भागात असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्या मंदिरच्या दोन मुलांच्या भांडणातून पालकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी भांडणात कॉलर धरल्याने श्वास गुदमरून एकाचा मृत्यू झाला. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका महिलेसह एकाला अटक करण्यात आली आहे.

सद्दाम अमर शेख (वय 27) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल गवंडी आणि नजमा अमीन आलासे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पंडित जवाहरलाल नेहरू या शाळेत मयत सद्दाम शेख याचा मुलगा आहे. त्याच शाळेत शब्बीर गवंडी याच्या बहिणीचा मुलगा पण शिक्षण घेत आहे. त्या दोन मुलांमध्ये भांडण झाल्यानंतर एकाने सलमा आलासे यांना सांगितले. त्यामुळे सलमा यांनी आपला भाऊ शब्बीर गवंडी याला बोलावून घेतले. गवंडी याने शाळेत जाऊन सद्दाम शेख याच्या मुलाला मारले. त्याने घरी येऊन तक्रार दिली. त्यामुळे सद्दाम शेख आणि गवंडी यांच्यामध्ये वादावादी झाली. वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, गवंडी याने सद्दाम याची कॉलर पकडली. त्यामुळे सद्दाम याचा श्वास कोंडून तो बेशुद्ध झाला. त्याला लोकांनी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेची माहिती होताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत अब्दुल गवंडी आणि त्याची बहीण सलमा आलासे यांना अटक केली. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.