
मुंबईतील सर्व पात्रताधारक फेरीवाल्यांना 10 जूनपासून ओळखपत्र देण्यात येणार आहे. ओळखपत्रावरील क्युआर कोडवर फेरीवाल्याबाबत सर्व सविस्तर माहिती राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईतील फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई होत असल्याचे सांगत आज उपमहापौर संजय घाडी यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी प्रशासनाने 10 जूनपासून ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे सांगितल्याचे ते म्हणाले. या ओळखपत्रांचे नमुने दाखवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पालिकेच्या सर्वेक्षणात मुंबईतील 99 हजार 435 फेरीवाले हे अधिकृत, पात्र ठरले आहेत. आणखीन 29,004 फेरीवाले देखील अधिकृत ठरले असून असे एकूण 1 लाख 30 हजार फेरीवाले पात्र ठरले असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. तर 20 ठिकाणी फेरीवाले बसवायचे नाहीत असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
सत्ताधाऱ्यांवरच नामुष्की!
मुंबईत एकही अनधिकृत फेरीवाला बसू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यानुसार कारवाई सुरू केल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र प्रशासनाकडून बांगलादेशी आणि अनधिकृत फेरीवाल्यांच्या नावाखाली सरसकट कारवाई सुरू असल्याचा आरोप करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवरच आली आहे.

























































