
मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या जानेवारी सत्राच्या प्रवेशास 17 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रवेशप्रक्रिया 19 जानेवारीपासून सरू झाली आहे. आजपर्यंत जानेवारी सत्रात 2 हजार 577 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. बारावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या सत्रात बीए किंवा बीकॉमच्या प्रथम वर्षात प्रवेश घेता येईल.
विद्यापीठ अनुदान आयोगाने वर्ष 2020 मध्ये मुंबई विद्यापीठास जानेवारी सत्राच्या प्रवेशाला मान्यता दिली आहे. जानेवारी सत्रात प्रथमच 900 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. 2021 च्या जानेवारी सत्राचे प्रवेश सुरू असून 17 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशास मुदतवाढ देण्यात आली आहे. या सत्रामध्ये विद्यार्थी बीए, बीकॉम, एमए, एमकॉम व एमए शिक्षणशास्त्र या पाच अभ्यासक्रमांमध्ये हे प्रवेश घेऊ शकतील.
आयडॉलमध्ये प्रथमच सेमिस्टर पद्धत
आयडॉलमध्ये प्रथमच सेमिस्टर पद्धत सुरू होत असून या जानेवारी सत्रामध्ये पदवीच्या प्रथम वर्ष बीए, बीकॉम बरोबरच पदव्युत्तर प्रथम वर्ष एमए व एमकॉममध्येही सेमिस्टर पद्धत सुरू करण्यात येत आहे.
एमएमध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी हे भाषा विषय असून मानव्य व सामाजिकशास्त्रामध्ये इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व समाजशास्त्र या विषयात प्रवेश घेता येईल. तर एमकॉममध्ये अकाउंट्स व व्यवस्थापन असे दोन समूह विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. हे सर्व प्रवेश ऑनलाईन आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/या संकेतस्थळावरून प्रवेश घ्यावा.




























































