
सामना प्रतिनिधी । पुणे
राज्यात झालेल्या सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू असून न्यायालयातही खटला सुरू आहे. न्यायालयाने मागितलेली कागदपत्रे सरकारने तत्परतेने दिली आहेत. आता निर्णय न्यायालयाने घ्यायचा आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दोषी असतील तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पवार यांचे आणि माझे वैयक्तिक वाद नाहीत. आम्ही राजकीय विरोधक आहोत. राजकीय विरोधातून केलेली टीका लोकशाहीत स्वीकारार्ह आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शिवसेना-भाजप, रासप, आरपीआय, शिवसंग्राम महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट, बारामती मतदारसंघातील उमेदवार कांचन राहुल कुल यांचे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते.
राजू शेट्टी यांनी पुरावे द्यावेत
अनेकजण आम्हाला छुपेपणाने मदत करत आहेत. पण त्यांची नावे मी कशी सांगणार, असे प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला. याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. राजू शेट्टी यांनी माझ्यावर काही आरोप केले असून बिंदू चौकात येण्याची भाषा केली आहे. परंतु शेट्टी खासदार आहेत, त्यांनी माझ्याविरुद्ध पुरावे असल्यास न्यायालयात जावे. तेथे पुरावे सादर करावेत, असेही पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास नाही
आम्ही घटना आणि कायदा मानतो. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास नाही. उमेदवारच आम्ही निवडणुका लढणार नाही, असे पक्ष नेतृत्वाला सांगत आहेत. राजीव सातव विद्यमान खासदार असून लढण्यास उत्सुक नाहीत. अशोक चव्हाण यांनीही लढायला सुरुवातीला नकार दिला होता. शरद पवारांनीदेखील माढ्यातून माघार घेतली. त्यामुळे कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सर्व विरोधी पक्षांना जाहीरपणे सांगितले आहे की, 2019 विसरून 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करा. त्यांचे बहुतेक नेत्यांनी ऐकले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.




























































