इ-दुनिया थांबली तर…??

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीरंग गोडबोले,[email protected]

न्यूझीलंडशेजारच्या टोंगा नावाच्या देशात अनिश्चित काळासाठी इंटरनेट बंद केले आहे. सर्वत्र डिजिटल अंधार पसरला आहे. असं आपल्या देशात झालं तर… फेसबुक… व्हॉट्सऍप… गुगल, शॉपिंग ऍप्स… यूटय़ुब… सारे सारे बंद… आभाळ कोसळेल…?? पाहूया जरा गंमत!!!

‘मिस जांभूळवाडी’ हा किताब मिळवलेली ऐश्वर्या भांडकुदळे रडकुंडीला आली होती. कारण आज जे घडले होते तसे यापूर्वी कधीच झाले नव्हते. दिवसातून किमान चार वेळा ती तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत असे. तिने पोस्ट करायचा अवकाश. वळवाची सर यावी तसा लाइक्सचा पाऊस पडायचा आणि त्यात ऐश्वर्या चिंब भिजून जायची, पण आज तिने टाकलेल्या फोटोला एकही लाइक आला नाही. त्यामुळे ती सैरभैर झाली. तिच्यावर जळणाऱया करिष्मा उचलबांगडी हिचे तर हे कारस्थान नाही ना असा संशयही तिला आला, पण मग तिच्या लक्षात आले की, तिला इंटरनेट कनेक्टिव्हिटीच नव्हती. ऐश्वर्याला अचानक गुमदरल्यासारखे होऊ लागले. श्वास कोंडल्याचा भास झाला. घाबरीघुबरी होऊन तिने ‘बीएफ’ला फोन लावला. ‘बीएफ’ म्हणजे बॉयफ्रेंड असे कुणाला वाटेल. पण ‘बीएफ’ म्हणजे बाळय़ा फुरसुंगे. याची मधल्या आळीत मोबाईल शॉपी होती. अख्ख्या जगात शास्त्रज्ञ एडिसनला जेवढा मान मिळाला नसेल तेवढा मान बाळय़ाला जांभूळवाडीत मिळायचा. कारण मोबाईल, वेब, इंटरनेट, केबल, डिश, सोशल मीडिया या सर्व बाबतीत बाळय़ा फुरसुंगे सर्वज्ञ आहे याची सर्वांना खात्री होती.

‘बीएफ’चा फोन लागेना. अरेच्चा? म्हणजे फोनही बंद? व्हॉट्सअप बंद? तिचा विश्वास बसेना. ती घरातून बाहेर पडली तर जांभूळवाडीत एकच गोंधळ चालू असलेला तिला दिसला. लोक सैरावैरा धावत होते. एकमेकांना काही तरी विचारत होते. आरडाओरडा करीत होते. आधी तिला वाटले भूकंप झाला आहे किंवा आग लागली आहे, पण मग कळले की, जांभूळवाडीचे सर्व प्रकारचे नेटवर्क्स ‘ब्लॅकआऊट’ झाले होते. कुणाचेच सेलफोन चालू नव्हते. त्यामुळे आता जगायचे कसे हा प्रश्न सगळय़ांना भेडसावू लागला. सगळेजण बाळय़ाला शोधत होते. ‘आमिर हेअर सॅलोन’चा इंटरनॅशनल बार्बर जावेद तोंडाचा आ वासूनच उभा होता आणि त्याच्यासमोर बिट्टू पाटील अर्धे केस कापलेले डोके घेऊन बसला होता. तोही आ वासून समोरच्या आरशात स्वतःचे झालेले माकड बघत बसला होता. याचे कारण होते. जावेद ‘ऑनलाइन’ हेअर कटिंग करण्यात एक्स्पर्ट होता. तो यूटय़ुबवरचे हेअर कटस् बघत बघत समोरच्याचे डोके भादरायचा, पण इंटरनेटशिवाय त्याची कैची चालत नसे की झीरो मशीन पळत नसे. बिट्टूचे निम्मे डोके तासून झाले आणि नेमके तेव्हाच इंटरनेट गळपटले. आता काय करायचे हे काही जावेदला समजत नव्हते.

तिकडे बबन फेंगडे याच्या ‘फेंग्ज चायनीज’च्या गाडीवर हाहाकार माजला होता. गिऱहाईकाने बबन्याला ‘चिंग खाओ चिकन विथ थुंग फाड सॉस’ची ऑर्डर दिली होती. बबन्याने ‘थुंग फाड सॉस’ची रेसिपी नेटवर वाचून सॉस बनवला होता आणि ‘चिंग खाओ’ कसे बनवायचे याचा डाऊनलोड अर्धा झाला असतानाच इंटरनेट गायब झाले. आता काय करायचे? शिवाय इतर गिऱहाईकांच्या पोटात कावळे कोकलत होते. कुणी ‘थुक फुक सूप’ मागवले होते, तर कुणी ‘ढिंग चाक मोमो’. बबन्या मात्र गॅस संपलेल्या सिलिंडरसारखा ढिम्म उभा होता. नेटशिवाय त्याचे पॅन हालत नव्हते, पण याहून पंचाइत झाली ती ई-टेम्पलमधील भजनीबुवा दत्तोबा यांची.

दत्तोबा रोज फेसबुक लाइव्हवर भजन, कीर्तन करीत. पंचक्रोशीतल्या बायाबापडय़ा त्यांच्या त्यांच्या स्मार्टफोनवर कीर्तन ऐकत आणि कीर्तनाच्या शेवटी दत्तोबाने फिरवलेल्या ई-थाळीमध्ये पेटीएम, फोन पे वगैरे ऍप्स वापरून पैसे टाकत. आजही दत्तोबाने नेहमीप्रमाणे ई-कीर्तन चालू केले. आख्यान होते लंकादहन. कीर्तन रंगात आले होते. रावणाने मारुतीच्या शेपटीला आग लावली आणि इंटरनेट गेले. आता पुन्हा नेट केव्हा येणार? आपण फेसबुकवर लाइव्ह कधी जाणार, मारुतीराया लंका कधी जाळणार आणि मला पैसे कधी ट्रान्सफर होणार? या चिंतेत दत्तोबा जळत होता. एरव्ही असा छोटा-मोठा प्रॉब्लेम आला तर दत्तोबा बाळय़ाच्या दुकानी जायचे. त्यांच्या देवळातला प्रसाद, अंगारा वगैरे देऊन फुकटात प्रॉब्लेम सोडवून द्यायचे, पण आज त्यांच्या ई-टेम्पलमधला संकटमोचन देव बाळय़ाच देव्हाऱयात नव्हता. कुठेतरी गायब झाला होता.

तिकडे गावचे पोलीसपाटील संपतराव कपाळाला हात लावून बसले होते. ते सध्या रजेवर होते. कारण त्यांची मुलगी आणि तिचा नवरा त्यांच्या चार वर्षांच्या काटर्य़ाला आजोबाच्या (म्हणजे संपतरावाच्या) हवाली करून अंदमानला गेले होते. संपतरावाला ही अंदमानपेक्षाही भयंकर काळय़ा पाण्याची शिक्षा होती. कारण त्यांचा उनाड नातू त्यांचे बिलकूल ऐकत नसे. फोनवर आईने किंवा बापाने दम दिल्याशिवाय आंघोळ वगैरे दूरच, तो साधी ब्रशला टूथपेस्टदेखील लावत नसे. आता हे कार्टे आपला जीव घेणार या कल्पनेने संपतरावांचा पोलिसी आवेश पार गळून ते भिजलेल्या कोंबडीसारखे दयनीय झाले होते. तिकडे गावच्या शाळेतले गरुड मास्तर खिन्न झाले होते. ते स्वतः शाळा कसे पास झाले याचे गुपित त्यांचे त्यांना माहीत होते. हे गुपित होते गुगल. आजही विद्यार्थ्यांनी कुठलीही शंका विचारली की गरुड मास्तर नेटभरारी घेऊन पटकन सर्च करीत आणि ती माहिती इतक्या सराईतपणे मुलांच्या तोंडावर फेकीत जणू हे त्यांना पाठच होते, पण मास्तरांच्या विद्वतेचे बिंग फुटायची पाळी आली होती. कारण त्यांची ज्ञानाची कुबडी ‘गुगल’ गायब झाली होती.

आज वर्गातली मुलेही चेव आल्यासारख्या शंका विचारत होती. ‘गुरुजी, कॅरॅमल कस्टर्डची राजधानी कुठली?’ एका मुलाने बावळट चेहरा करून विचारले. ‘मला वाटते पॅरिस’ असे म्हणून मास्तरांनी हसे करून घेतले. ‘तात्या टोपे कोण होते?’ या मुलांनी विचारलेल्या प्रश्नावर मास्तरांनी ‘महाराष्ट्राच्या रणजी टीमचे कॅप्टन’ असे उत्तर दिले आणि ते क्लीन बोल्ड झाले. इंटरनेट कट झाले म्हणजे गरुड मास्तरांचे पंखच छाटले गेले होते. इतक्यात बाईकवर बसून गावात येणारा बाळय़ा लोकांना दिसला. ‘गोविंदा आला रे आला’च्या चालीवर गावकऱयांनी ‘बाळय़ा आला रे आला, जरा नेटवर्क संभाल ब्रिजबाला’ असा जल्लोष केला. भगवान श्रीकृष्णाने जसा गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून गोकुळ नगरीच्या गोपाळांना वाचवले होते. तसेच बाळय़ाने करंगळीने बंद पडलेले इंटरनेट नेटवर्क उचलून धरावे आणि समस्त जांभूळवाडीच्या नागरिकांना वाचवावे असा धावा सगळय़ांनी केला, पण बाळय़ाने स्पष्ट नकार दिला. त्याने काय घडले हे सांगितले आणि जांभूळवाडीच्या लोकांचे डोळे खाडकन उघडले.

घडले होते असे की, हणम्या व्हटकरचा बैल मेला. त्याला पुरायला हणम्याने खड्डा खणायला घेतला. खणता खणता कुदळ बसली ऑप्टिक फायबर केबलवर. ती तुटली. ‘आता ते काम होईस्तोवर नेट बंद. बाळय़ाने सगळय़ांना चावडीवर बोलावून हे सांगितले. मग गावातला एक शहाणा म्हातारा बोलता झाला. तो म्हणाला की, ‘बाबांनो ते तुमचं इंटरनेट का काय ते ही कामाची सोय आहे. तेच काम नव्हे. हाताला काम यायला पाहिजे, कसब यायला पाहिजे. डोक्यात ज्ञान असलं पाहिजे. इंटरनेट त्यानंतर. तेव्हा आधी कसब शिका, ज्ञान घ्या. नाही तर असं अवलंबून राहाल तर तोंडघशी पडाल. जांभूळवाडीचे लोक कामाला लागले. ऐश्वर्याही शहाणी झाली. आता इंटरनेटचा वापर ती अभ्यासाला जास्त आणि टाइमपासला कमी करते.