
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशात दूरसंचार क्रांती आणली. जर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशात अनेक क्रांती ते घडवतील असे वक्तव्य काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखातीत त्यांनी हे वक्त्यव्य केले आहे. तसेच राहुल गांधी जर पंतप्रधान झाले तर देशाचा विकासर 10 टक्के होईल असा दावाही त्यांनी केला आहे.
पित्रोदा म्हणाले की, “हिंदुस्थानात सर्वाधिक लोकसंख्या तरुणांची आहे, यामुळे देशाची अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे. दुसर्या देशात वृद्ध व्यक्तींची लोकसंख्या जास्त आहे, तर ते काय विकत घेणार? अनेक देशांत बाजार नाही. जपानसारख्या देशात शाळा बंद पडत चालल्या आहेत. कारण विद्यार्थीच नाहीत. आपल्याकडे जितक्या शाळा सुरू करू तितके कमी असल्याचे पित्रोदा यांनी म्हटले.
तसेच “देशाचा विकासदर 10 टक्क्यापर्यंत आणणे शक्य आहे. जर राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आले तर ते हे शक्य आहे.” देशात विकास कसा घडवायचा हे आम्हाला माहित असल्याचे पित्रोदा यांनी म्हटले.
विकासदर कसा वाढवणार या प्रश्नावर पित्रोदा म्हणाले की, “देशातील तरुणांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर केला पाहिजे. उद्यमशील तरुणांना सरकारी हस्तक्षेपासून दूर ठेवले पाहिजे. गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण निर्मितीची गरज आहे.” यासाठी देशाला तरुण नेतृत्वाची गरज असल्याचे पित्रोदा यांनी म्हटले.
























































