
यंदाच्या मोसमात फ्रेंच ओपनची राणी ठरलेल्या पोलंडच्या इगा स्विटेकने क्रोएशियाच्या जना फेट हिचा सरळ सेटमध्ये पराभव करून विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील आपल्या अभियानास प्रारंभ केला. दुसरीकडे महिला गटात युलिया पुतिनसेवाला सलामीच्या लढतीत बिगरमानांकित खेळाडूंकडून पराभवाची पराभवाची नामुष्की पत्करावी लागली.
इगा स्विटेकने जना फेट हिचा 6-0, 6-3 फरकाने धुव्वा उडवला. ही लढत सव्वा तासात संपली. पाचव्या मानांकित ग्रीसच्या मारिया सक्कारी हिने ऑस्ट्रेलियाच्या झोई हिवेसचा 6-1, 6-4 असा पराभव करून दुसऱया फेरीत प्रवेश केला. ही लढत एक तास 17 मिनिटांपर्यंत चालली. 27 वे मानांकन असलेल्या कझाकिस्तानच्या युलिया पुतिनसेवा हिला सलामीच्या लढतीतच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. बिगरमानांकित एलिझ कॉर्नेटने तिला 6-3, 7-6 (7/5) असा पराभवाचा धक्का देत दुसरी फेरी गाठली. एलिझने एक तास 46 मिनिटांच्या लढतीत युलियाचा प्रतिकार मोडून काढला. दुसरा सेट टायब्रेकरपर्यंत गेला, मात्र यातही एलिझने बाजी मारत विजयावर शिक्कामोर्तब केला.
पुरुष एकेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक कायर्कियोसने पाच सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत इंग्लडच्या पॉल जुब्बोचा 3-6, 6-1, 7-5, 7-6(3/7), 7-5 असा पराभव करून विजयी सलामी दिली. ही चुरशीची लढत 3 तास 5 मिनिटांपर्यंत रंगली. 15 व्या मानांकित अमेरिकेच्या रेली ओपेल्काला पहिल्या विजयासाठी झगडावे लागले. बिनगरमानांकित स्पेनच्या कार्लोस टॅबर्नरला पराभूत करण्यासाठी त्याला 7-6(7-5), 6-4, 6-4 असा 2 तास 28 मिनिटांपर्यंत घाम गाळावा लागला.
गतउपविजेत्या बेरेटिनीला कोरोनाची लागण
गतउपविजेत्या इटलीच्या माटियो बेरेटिनीला कोरोनाची लागण झाल्याने यंदाच्या विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. सलामीच्या लढतीत उतरण्यापूर्वी काही तास आधीच तो स्पर्धेतून बाहेर झाला. ऑल इंग्लंड क्लबने याबाबत माहिती दिली आहे.





























































