धरणांचा तालुका असलेल्या इगतपुरीसह पश्चिम पट्ट्याकडे पावसाची पाठ

544

पावसाचे माहेरघर आणि धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीसह पश्चिम पट्ट्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये जुलैअखेर अवघा 21 ते 49 टक्के इतकाच पाऊस झाल्याने भातशेती संकटात सापडली आहे. मागील वर्षी जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात 70 टक्के पाऊस झाला होता, यंदा ही टक्केवारी 47 इतकीच आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये 41 टक्केच साठा असून, अशीच परिस्थिती राहिल्यास नाशिकसोबतच नगर जिल्हा आणि मराठवाड्याला पाणीप्रश्न भेडसावण्याची चिन्हे आहेत.

नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात दरवर्षी सर्वाधिक पाऊस होतो, तर पूर्वेकडील तालुक्यांमध्ये पर्जन्यमान कमी असते. मात्र, यंदा परिस्थिती अगदी उलट आहे. पूर्वेकडील येवला, मालेगाव, नांदगाव, सटाण्यात कमी कालावधीत चांगल्या पावसाची नोंद झाली, तर दमदार पावसासाठी ओळखल्या जाणार्‍या इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, नाशिक भागात कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे.

23 टक्के कमी पाऊस
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला सगळीकडे पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दोन-तीनदा झालेला मुसळधार पाऊस वगळता पश्चिमेकडे पावसाने उघडीप दिली. त्यामुळे प्रथमच आदिवासीबहुल तालुक्यात कमी पाऊस होवून भात रोपांच्या पुनर्लागवडीला उशीर झाला. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. जिल्ह्याचे एकूण सरासरी पर्जन्यमान 1075 मि.मी. आहे. मागील वर्षी 31 जुलैपर्यंत 698 (70), तर यंदा 474 (47 टक्के) पावसाची नोंद झाली. आदिवासीबहुल इगतपुरीसह चार तालुक्यांमध्ये 21 ते 49 टक्के एवढाच पाऊस झाला आहे. दरवर्षी तो 80 टक्क्यांहून अधिक असतो.

धरणसाठा 41 टक्केच
नाशिक जिल्ह्यातील 24 प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता 65 हजार 818 दशलक्ष घनफूट आहे. यंदा 26 हजार 759 (41 टक्के) साठा झाला आहे. मागील वर्षी या तारखेला साठा 31 हजार 419 (48 टक्के) होता. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण आता 51 टक्के भरले आहे, त्यात मागील वर्षी जुलैअखेर 84 टक्के साठा होता. जिल्ह्यातील मोठ्या दारणा धरणात मागील वर्षी 84, तर आता 69 टक्के पाणी आहे. मागील वर्षी भावली, मुकणे, वालदेवी, कडवा, पालखेड ही धरणे 51 ते 100 टक्के भरली होती, यंदा हा साठादेखील कमी आहे.

31 जुलैपर्यंतचा पाऊस मिलीमीटरमध्ये आणि कंसात टक्केवारी –

तालुका      सन 2020        सन 2019
नाशिक      346 (49)        634 (91)
इगतपुरी    1517 (49)     2578 (84)
दिंडोरी        230 (33)       501 (73)
पेठ           481 (23)      1516 (74)
त्र्यंबकेश्वर   472 (21)      1783 (80)
मालेगाव     526 (114)      296 (64)
नांदगाव      443 (90)       133 (27)
चांदवड       301 (56)       212 (40)
कळवण      290 (45)       175 (27)
सटाणा       554 (113)     311 (63)
सुरगाणा     481 (25)      1213 (64)
देवळा        352 (83)       171 (40)
निफाड       252 (54)       283 (61)
सिन्नर      510 (97)       357 (68)
येवला       359 (79)       346 (76)
एकूण       474 (47)       698 (70)

आपली प्रतिक्रिया द्या