‘वन… टू… चाचाचा…’ दर्शकांच्या क्लॅपिंगवर थिरकला रोबो थेस्पियन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नमस्ते इंडिया’ असे म्हणत त्याने सुरुवात केली आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. झगमगते यंत्रयुक्त शरीर, एलईडी लाइटस्ने चकाकणारे डोळे, साभिनयासह बोलणे, हालचाल करणे असा त्याचा प्रत्येक परफॉर्मन्स शिट्टय़ा आणि टाळ्या घेऊन गेला. नाव होते ‘रोबो थेस्पियन’. इंग्लंडहून खास पवई आयआयटीच्या टेकफेस्ट महोत्सवासाठी तो आला होता आणि पाच हजारांवर दर्शकांसमोर तो त्यांच्याच क्लॅपिंगवर थिरकलाही.

अभिनय करणारा जगातला एकमेव रोबो म्हणून ‘रोबो थेस्पियन’ची ख्याती आहे. आज त्याचा अभिनय मुंबईकरांनीही पाहिला. सुरुवातीलाच विनम्रपणे नमस्कार करताना त्याने आपण कुठून आलोय याचीही माहिती दिली. हिंदुस्थानबद्दल तुला काय माहिती आहे असे त्याला विचारले गेले. त्यावर ‘हिंदुस्थानात विविध धर्मीय एकत्र राहतात आणि तो विविध संस्कृतींनी नटलेला आहे’ असे उत्तर त्याने दिले.

मुंबई शहराचीही रोबो थेस्पियनने प्रशंसा केली. ‘मुंबई इज फॅब्युलस सिटी’ असे तो म्हणाला. अभिनय करणाऱया थेस्पियनला बॉलीवूडबद्दलही माहिती होती. बॉलीवूडमधील अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार हे आपल्याला माहिती असल्याचे त्याने सांगितले. अभिनेते रजनीकांत यांनी साकारलेला ‘रोबो चिट्टी’ही मला माहिती आहे असे तो म्हणाला.

रोबो थेस्पियनला अभिनयाबरोबर गाणेही गाता येते आणि नाचताही येते अशी त्याची ख्याती सांगितली जाते. टेकफेस्टमध्येही त्याला गाण्याची आणि नाचण्याची विनंती केली गेली. एक इंग्रजी गाणे त्याने पार्श्वगायकासारखे सुरामध्ये गायले. नाचण्यासाठी त्याला संगीत लाभले ते दर्शकांच्या टाळ्यांचे. ‘वन-टू…चाचाच, वन-टू…चाचाचा’ असे सर्वांनी एकासुरात टाळ्या वाजवत म्हटले आणि त्या तालावर रोबो थेस्पियन व्यासपीठावर थिरकला. शेवटी टेकफेस्टमध्ये येऊन आपल्याला खूप आनंद झाला अशी प्रतिक्रियाही त्याने दिली. दर्शकांच्या आग्रहास्तव रोबो थेस्पियनचा शो दुसऱयांदा पुन्हा आयोजित करावा लागला.

रिमोट कंट्रोलवर बग्गी रेसिंग

पवई येथील आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’ महोत्सवात तंत्रज्ञानाचा आविष्कार पाहण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली आहे. पहिल्या दिवशीप्रमाणे आजही आयआयटीच्या कॅम्पसमध्ये रिमोटवर चालणाऱया निट्रो बग्गींची शर्यत रंगली. रेसिंग ट्रकवर अत्यंत सराईतपणे या बग्गी धावल्या. त्यांचे हॅण्डलर दुसरेच होते, पण उंचवटे पार करताना या बग्गी जमिनीपासून वर उडताना पाहून त्यात खरोखरच ड्रायव्हर बसला असावा असाच भास दर्शकांना होत होता.

उडणारी टॅक्सी

‘एरोहंस’ हे प्रोटोटाइप टेकफेस्टमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही भविष्यातील उडणारी टॅक्सी आहे. नाशिकमधील इंजिनीयर्सच्या संकल्पनेतून एरो हंस साकारली आहे. या टॅक्सीमधून चार जण प्रवास करू शकतात. वाहतूककोंडीवर ही टॅक्सी एक प्रभावी उपाय ठरू शकते. 2024 पर्यंत अशा टॅक्सींचे उत्पादन सुरू करण्याचा इंजिनीयर्सचा विचार आहे. चीन आणि युरोपियन देशांमध्ये अशा हवाई टॅक्सींच्या पर्यायांवर विचार केला जात आहे.

धडपडले, पडले…पुन्हा भिडले, हजारोंच्या साक्षीने रोबोंची कुस्ती

‘रोबोवॉर्स’मध्ये अनेक रोबो काचेच्या भिंती असलेल्या रिंगणात एकमेकांशी मनसोक्त भिडले. धडपडले, पडले…पुन्हा उठले आणि समोरच्या प्रतिस्पर्ध्यावर दुप्पट ताकदीने हल्ला चढवला. हजारो लोकांनी रोबोंच्या या कुस्तीचा आनंद घेतला. अमेरिका आणि इंग्लंडमधून आलेल्या चॅम्पियन्स रोबोंचा त्यात समावेश होता.