IIT इंजिनीयर सरकारी नोकरीसाठी बनला रेल्वेत ट्रॅक मेंटेनर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणतेही काम हलके नसते असे बोलले जाते. पण अशी अनेक कामे आहेत जी करायला आपल्याला संकोच वाटतो. पवईच्या आयआयटी मुंबईतून इंजिनीयर झालेल्या कुमार श्रवण याने मात्र प्रत्येक कामाला एक वेगळे महत्त्व असते हे आपल्या कृतीमधून दाखवून दिले. एका जगविख्यात संस्थेतून इंजिनीयरिंगची पदवी घेऊनही श्रवण याने रेल्वेमध्ये ट्रक मेंटेनर म्हणून नोकरी स्वीकारली आहे.

बिहारमधील पालिगंज गावचा रहिवासी असलेला कुमार श्रवण याचे 2015मध्ये पदवी शिक्षण पूर्ण झाले. जेईई परीक्षेत चांगले गुण मिळवल्यानंतर आयआयटी मुंबईत प्रवेश घेऊन त्याने एकाच वेळी मेट्रोलॉजी आणि मटेरियल सायन्स अभ्यासक्रम घेऊन बी.टेक आणि एम.टेकचे शिक्षण पूर्ण केले. तरीसुद्धा तो झारखंडमध्ये ट्रक मेंटेनर म्हणून नोकरी करतो. गेल्या 30 जुलैपासूनच तो धनबाद रेल्वे मंडळात या नोकरीवर रुजू झाला. श्रवणने ट्रक मेंटेनर म्हणून नोकरी स्वीकारण्यामागे वेगळेच कारण आहे. नामांकित खाजगी कंपनीत लाखो रुपयांचे वार्षिक पॅकेज त्याला मिळू शकते. पण रेल्वेची नोकरी ही सरकारी नोकरी असून त्या नोकरीत स्थैर्य आहे, असे त्याचे म्हणणे आहे. इंजिनीयर असूनही उन्हातान्हात खांद्यावर हाथोडा आणि पाना घेऊन ट्रक मेंटेनन्सचे काम करतो याबद्दल त्याला काहीच संकोच वाटत नाही.

भविष्यात आणखी चांगल्या पदावर जाईन

आयआयटीत शिकत असतानाच तेथील कॅम्प्स प्लेसमेंटमध्ये आपल्याला अनेक खाजगी कंपन्यांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. परंतु त्या नॉन-कोअर क्षेत्रातील असल्याने आपण नाकारल्या असे श्रवण सांगतो. आता मी रेल्वे मंडळाच्या परीक्षाही देत असून भविष्यात आणखी चांगल्या पदावर रुजू होईन, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

रेल्वेतील नोकऱ्यांसाठी उच्चशिक्षित उमेदवारही अर्ज करतात. त्यात एमए, पीएचडी आणि बी.टेक झालेल्या उमेदवारांचा समावेश असतो. ग्रुप-डी वर्गातील नोकरीवर आयआयटी मुंबईचा इंजिनीयर रुजू झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते.