आर्थिक मंदीची झळ आयआयटीलाही, ‘कॅम्पस इंटरव्हय़ू’कडे नामांकित कंपन्यांची पाठ

1016

आर्थिक मंदीची झळ आयआयटीलाही बसली असून डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ‘कॅम्पस इंटरव्हय़ू’कडे अनेक नामांकित कंपन्यांनी पाठ फिरवली आहे. दरवर्षी कॅम्पसमध्ये होणाऱ्या प्लेसमेंटदरम्यान हुशार विद्यार्थ्यांना पगाराची भलेमोठी पॅकेज देणाऱ्या कंपन्या यंदा कॅम्पस इंटरव्हय़ूपासून चार हात लांब असल्याचे समोर आले आहे.
अनेक कंपन्यांनी शैक्षणिक संस्थांचे कॅम्पस इंटरव्हय़ूसाठी येण्याचे आमंत्रण नाकारले आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्था अनेक नव्या कंपन्यांना कॅम्पस इंटरव्हय़ूला येण्यासाठी पाचारण करीत आहेत. आयआयटी प्लेसमेंटचा पहिला टप्पा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
आयआयटी मुंबईला 163 प्री-प्लेसमेंट ऑफर्स
आयआयटी मुंबईला 5 नोव्हेंबरपर्यंत केवळ 163 प्री-प्लेसमेंटच्या ऑफर्स आल्या आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 141 होती. यंदा अनेक नवख्या कंपन्यांना प्लेसमेंटसाठी आमंत्रित केले आहे. यापैकी 115 कंपन्यांची प्लेसमेंटसाठी निवड केली आहे.
‘वर्ल्ड क्वॉन्ट’ने 40 लाख रुपयांचे सर्वाधिक देशांतर्गत पॅकेज ऑफर केले आहे. ही कंपनी यंदा केवळ आयआयटी मुंबईच्याच कॅम्पस इंटरव्हय़ूमध्ये सहभागी होणार आहे.
टॉवर रिसर्च आणि ग्रॅव्हिटेशन रिसर्चसारख्या कंपन्यांचा प्लेसमेंटसाठी होकारच आलेला नाही.
तसेच अमेरिकन क्लाऊड डेटा मॅनेजमेंट रूबरिक कंपनीदेखील प्लेसमेंटमध्ये यंदा सहभागी होणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या