कोरोना संशयितांवर पवईच्या आयआयटीच्या संशोधकांची बारीक नजर  

1092

कोरोनाच्या संशयित रुग्णांना 14 दिवस घराबाहेर न पडण्याची सक्ती करण्यात आली आहे. तरीसुध्दा अनेक संशयित रुग्ण घराबाहेर पडत असल्याच्या तक्रारी आहेत. आता या रुग्णांवर पवई येथील आयआयटी मुंबईच्या संशोधकांचे तंत्रज्ञानच बारीक नजर ठेवणार आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी बनवलेल्या ‘सेफ’ आणि ‘कोरोन्टाईन’ या दोन मोबाईल अ‍ॅपद्वारे कोरोना संशयितांवर ट्रॅक ठेवला जाणार आहे.

आयआयटी मुंबईच्या सीएसई विभागातील प्राध्यापक भास्करन रमण आणि प्राध्यापक कामेश्वरी चेबरोलू यांच्या टीमने ‘सेफ’ हा मोबाईल अ‍ॅप विकसित केला आहे. खरंतर हा अ‍ॅप गेल्या अनेक वर्षांपूर्वीच विकसित केला गेला आहे. आयआयटीतील हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद ठेवण्यासाठी या अ‍ॅपचा वापर केला गेला. हाच अ‍ॅप आता कोरोना संशयितांवर नजर ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांना वापरता येणार आहे. इतरांपासून वेगळे म्हणजेच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिलेले संशयित रुग्ण त्याचे पालन करत आहेत की नाहीत याचा ट्रॅक या अ‍ॅपद्वारे ठेवता येणार आहे. लोकेशन, सेल्फीद्वारे ओळख आणि वेळ अशा तीन पध्दतीने हा ट्रॅक ठेवता येऊ शकतो.

आयआयटी मुंबईतील कॉम्प्युटर सायन्स विभागातील प्रा. गणेश रामकृष्णन आणि आयईओआर विभागातील प्रा. मंजेश हनवल यांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेला दुसरा मोबाईल अ‍ॅप आहे ‘क्वारंटाईन’. या अ‍ॅपद्वारे कोरोना संशयितांना जीपीएसद्वारे ट्रॅक करता येऊ शकते. संशयितांच्या जीपीएस लोकेशन्सची माहिती या अ‍ॅपवरून वेळोवेळी संबंधित अधिकार्‍यांना मिळू शकते. रुग्ण क्वारंटाईन झोनमधून बाहेर गेला तर त्याची माहिती त्यांना तातडीने मिळेल.

या दोन्ही अ‍ॅपचे विशेष म्हणजे ती फक्त आरोग्य अधिकारी आणि कोरोना संबंधित यंत्रणाच वापरू शकतात. त्यावर रुग्णांची सर्व माहिती गुप्त राखली जाऊ शकते. आयआयटी मुंबईचे व्यवस्थापन या दोन्ही अ‍ॅपची सेवा देशातील आरोग्य यंत्रणांसाठी विनामुल्य देण्यास तयार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला या अ‍ॅप्सबद्दल कळवण्यात आले असून पालिकेच्या प्रतिसादाची प्रतिक्षा आहे असे आयआयटी मुंबईकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या