आय विल किल यू, दहा लाखांच्या बक्षिसांसाठी रोबोंची कुस्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बक्षिस मिळवण्यासाठी फक्त माणसांच्याच कुस्त्या होत नाहीत तर माणसाने बनवलेले रोबोही एकमेकांना भिडतात. ‘आय विल किल यू…’ म्हणत एकमेकांवर तुटून पडतात. रोबोंची ही कुस्ती मुंबईकरांना पहायला मिळणार आहे. पवईच्या आयआयटी मुंबईत होणाऱया ‘टेकफेस्ट’ महोत्सवात रोबोंची ही कुस्ती रंगणार आहे. त्यासाठी जगभरातील रोबो मुंबईत दाखल झाले आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेला ‘टेकफेस्ट’ 3 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यात हिंदुस्थानातील सर्वात मोठी रोबोंची कुस्ती होणार आहे. 28 बाय 28 बाय 12 फूटाच्या रिंगणात रोबो परस्परांशी झुंजणार आहेत. हे ‘रोबोवॉर्स’ म्हणजे टेकफेस्टमधील प्रमुख आकर्षण असते.

ब्राझील, अमेरिकेतील वर्ल्ड चॅम्प टीम्सचा सहभाग

रोबोवॉर्समध्ये जगातील दहापेक्षा जास्त देशांमधील रोबो सहभागी होणार आहेत. दरवर्षी टेकफेस्टमध्ये ही स्पर्धा असते आणि त्यात वर्षानुवर्षे रोबोंचा सहभाग वाढत आहे. यंदाच्या वर्षी ब्राझीलमधील वर्ल्ड चॅम्पियन ‘टीम वॉरिअर’, ब्रिटीश चॅम्पियन ‘टीमरोमिंग रोबोट्स’ आणि अमेरिकेतील ‘टीमएरिया 51 रोबोटीक्स’ आपल्या अत्याधुनिक रोबोंसह या स्पर्धेत उतरणार आहे.

उचलून आपटणारा, दहा किलोचा हातोडा मारणारा रोबो

अमेरिकेतील ‘टीमएरिया 51 रोबोटीक्स’च्या रोबोंना इलेक्ट्रीक लिफ्टर वेपन्स आहेत. याशिवाय आग ओकणारे रोबो आणि दहा किलो वजनाचा हाथोडा उचलून हल्ला करणारे रोबोही या स्पर्धेसाठी आले आहेत. मुंबईकरांना हे रोबोवॉर बघण्याची संधी टेकफेस्टने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी प्रवेश विनामुल्य असला तरी प्रथम येणाऱयास प्राधान्य दिले जाणार आहे.

टेकफेस्टच्या फेसबुक पेजला 30 लाख लाईक्स

टेकफेस्ट महोत्सवाबद्दल जगभरात उत्सुकता असते. विज्ञान-तंत्रज्ञानातील विविध आविष्कार सादर करणाऱया या महोत्सवातील घडामोडी पाहण्यास लाखो लोक ऑनलाईन असतात. टेकफेस्टच्या फेसबुक पेजला आतापर्यंत 30 लाखांपेक्षा जास्त यूजर्सनी लाईक्स दिल्या आहेत.