अलिबागमधील स्मिता अमृता सोयासायटीच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्हाधिकारी यांनी अलिबागमधील चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शिवाजी नगरमध्ये स्मिता अमृता सोसायटीच्या आठ सदनिकाची बांधकाम परवानगी दिली असताना व्यावसायिकाने दोन अनधिकृत सदनिकाचे बांधकाम केले आहे. यापैकी तळमजल्यावरील बांधकाम व्यावसायिक अरुण मालवणकर यांच्या नावावर असलेली अनधिकृत सदनिका पाडण्याचे आदेश अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिले आहेत. अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई तहसील कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आली आहे. तर दुसऱ्या अनधिकृत सदनिका धारकाने स्थगिती घेतली असल्याने त्यांच्यावरील कारवाई तूर्तास टळली आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या अनधिकृत बांधकामाचा फटका सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सोसावा लागत आहे.

चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत शिवाजी नगर परिसरात सर्व्ह नंबर 4 हिस्सा नंबर 2 या भूखंडावर बांधकाम व्यावसायिक अरुण मालवणकर यांनी स्मिता अमृता सोसायटीचे बांधकाम केले आहे. 25 फेब्रुवारी 2011 रोजी रायगड जिल्हाधिकारी यांनी बिनशेती भूखंडावर 280 चौरस मीटरमध्ये 8 सदनिका बांधण्याची परवानगी दिली होती. यामध्ये 279.355 चौरस मीटर बांधकाम केले आहे. मात्र बांधकाम व्यावसायिक यांनी तळमजल्यावर एक सदनिका आणि पहिल्या मजल्यावर तीन सदनिकांची मंजुरी असताना अधिकच्या दोन अनधिकृत सदनिकेचे बांधकाम केले आहे. बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनात याबाबत सदनिका धारकांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार रायगड जिल्हाधिकारी यांनी अलिबाग तहसीलदार यांना अनधिकृत बांधकाम पडण्याबाबत आदेश दिले होते. तळमजल्यावर असलेल्या 002 या अनधिकृत सदनिकेत मंगेश सुर्वे हे भाडोत्री राहत असून पहिल्या मजल्यावर जयश्री गुरव या 001 या सदनिका धारक राहत आहेत. गुरव यांनी याबाबत न्यायालयात जाऊन स्थगिती आदेश मिळविला आहे. तर तळमजल्यावरील भाडोत्री मंगेश सुर्वे यांना तहसीलदार यांनी सदनिका खाली करण्याची नोटीस दारावर लावली होती. मात्र त्यांनी सदनिका रिकामी केली नाही. तहसील कार्यालयातील अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या देखरेखीखाली शुक्रवारी अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे.