बार्शी तालुक्यातील फटाक्यांचा ‘तो’ कारखाना बेकायदेशीर मालकासह चालकावर गुन्हा दाखल; दोघेही फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बार्शी तालुक्यातील शिराळा येथे  फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटाप्रकरणी कारखान्याचे मालक व चालक या दोघांविरुद्ध पांगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा कारखाना बेकायदेशीर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस व प्रशासन तळ ठोकून आहे. त्यामुळे अद्याप वास्तवदर्शी माहिती व कामगारांची नावे समजू शकली नाहीत. ‘इंडियन फायर वर्क्स’ असे कारखान्याचे नाव आहे.

युसूफ मणियार (रा. बार्शी) व नाना पाटेकर (रा. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, दोघेही फरार आहेत.

बार्शी तालुक्यातील शिराळा गावच्या हद्दीत इंडियन फायर वर्क्स हा फटाक्याचा कारखाना बेकायदेशीरपणे युसूफ मणियार व नाना पाटेकर हे दोघे भागीदारीत चालवित होते. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी (रविवारी) भीषण स्फोट झाल्याने यात सात कामगारांचा मृत्यू, तर काहीजण गंभीर जखमी आहेत. या स्फोटामुळे मनुष्यहानी तर झाली आहेच, आजूबाजूच्या शेतांमधील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर मणियार व पाटेकर हे फरार झाले आहेत. जखमींवर सोलापूर व धाराशीव येथील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. घटनास्थळी पोलीस प्रशासन तळ ठोकून असून, वास्तवदर्शी माहिती व झालेल्या नुकसानीबाबत अद्यापि माहिती पुढे आलेली नाही. पांगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे तपास करीत आहेत.

2011च्या घटनेची पुनरावृत्ती

बार्शी तालुक्यात पोलीस प्रशासनाला हाताशी धरून बेकायदेशीररीत्या फटाक्यांचे कारखाने सर्रास चालविले जातात. 2011मध्ये या ठिकाणी अशीच घटना घडली होती. यात कारखाना मालकाच्या भावाचा स्फोटात मृत्यू झाला होता. तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा तशीच भीषण घटना घडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष

बार्शी तालुक्यातील ही भीषण घटना जिह्यासह राज्याला हादरवून सोडणारी, अनेक मजुरांचा मृत्यू ही वेदनादायी घटना असताना, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घटनेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. भाजपच्या मतदारसंघात झालेल्या हा भीषण स्फोटाचा ठपका लोकप्रतिनिधींवरही बसत आहे. त्यामुळे पालकमंत्री विखे-पाटील या घटनेची दखल घेत नसल्याची चर्चा आहे. विखे-पाटील हे जखमींची विचारपूस करण्यासाठी येऊन मदत जाहीर करतील, अशी अपेक्षा नातेवाईकांना होती; परंतु याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.