
जालना येथील औद्योगिक वसाहतीमधून एका गोडाऊनमध्ये ठेवलेला गुटख्याचा मोठा साठा विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यावरून अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या पथकाने छापाटाकून 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जालना येथील औद्योगिक वसाहत भागातील एका गोडाऊनमध्ये गुटख्याचा मोठा साठा असून तो बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पवार यांनी पथकासह बुधवारी सकाळी छापा टाकला. यावेळी गोडाऊनची झडती घेतली असता गोडाऊनमध्ये आणि तिथे उभ्या असलेल्या तीन पिकअप टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. तसेच टेम्पोमध्ये गुटखा भरणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तर अन्य काहीजण पळून गेले. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह पथकातील कर्मचारी प्रदीप घोडके, विशाल काळे, ज्ञानेश्वर केदारे आदींनी केली. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.























































