
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील जागा असतानाही जाणीवपुर्वक महानगरपालिकेस टाळून ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडून बांधकाम परवागनी घेऊन गृहनिर्माण प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या लातूरातील तिघा नावंदर बंधू विरुध्द येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात लातूर शहर महानगरपालिकेकडे माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लीकार्जुन भाईकट्टी यांनी तक्रार दाखल केलेली होती. लातूर एमआयडीसीजवळ लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये द्वारका नगरी नावाने भव्य असा गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता. मौजे बसवंतपूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडून बांधकाम परवानगी घेण्यात आल्याचे दाखवण्यात आलेले होते. महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर महापालिका सक्रीय झाली. महानगरपालिकेच्यावतीने नितीनकुमार विजयकुमार नावंदर, महेश नयनकुमार नावंदर, अभिषेक हेमंतकुमार नावंदर यांना दोन वेळा नोटीस बजावण्यात आली. तसेच बांधकाम बंद करण्याची सुचना देण्यात आली. परंतु या नोटीसीचा त्यांच्यावर कांहीच फरक पडला नाही.
श्रीमती शैला डाके क्षेत्रीय अधिकारी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीत नमूद केले आहे की, नितीनकुमार विजयकुमार नावंदर, महेश नयनकुमार नावंदर, अभिषेक हेमंतकुमार नावंदर यांनी सव्र्हे क्रमांक ३३ गट नं. ४८ बसवंतपूर येथे द्वारकानगरी ग्रहप्रकल्पाचे अनाधिकृत बांधकाम केले आहे म्हणून दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे महानगरपालिकेने या प्रकरणी बांधकाम परवानगी देणाऱ्या बसवंतपूर येथील ग्रामसेवकाविरुध्द जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडेही तक्रार दाखल केली आहे. महापालिकेच्या कर अधिक्षकांना मौजे बसवंतपूर सव्र्हे क्रमांक ३३ गट क्रमांक ४८ मधील बांधकामास परवानगी घेतलेली नसल्यामुळे रो हाऊसेस व बंगले यांची मालमत्ता रजीस्टरला नोंद घेऊ नये असे आदेशीत केले आहे. त्याचप्रमाणे दुय्यम निबंधक यांना उपरोक्त ठिकाणचे प्लॉट व रो हाऊसेस व बंगले यांचे खरेदीखत करण्यात येऊ नये अशी सुचनाही केली आहे.

























































