
बर्फाच्या कारखान्यात सुरू असलेल्या बनावट दारू बनविण्याच्या उद्योगावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून बनावट देशी-विदेशी दारू, रसायन साहित्य, वाहने असा साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली.
शहेबाज युनूस पटेल (वय 29, रा. संजयनगर, श्रीरामपूर), मोहन यशवंत काळे (रा. दत्तनगर, श्रीरामपूर), राकेशकुमार केवलप्रसाद दहिया ऊर्फ मुन्ना (मूळ रा. मध्य प्रदेश, हल्ली रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), चंद्रकांत श्याम पवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून, पवार हा फरार आहेत.
संजयनगर ईदगाह मैदान परिसरात असणाऱया बर्फाच्या कारखान्यात मोठय़ा प्रमाणात बनावट देशी-विदेशी दारू तयार करणारा कारखाना असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱयांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी या ठिकाणी बनावट देशी व विदेशी दारू तयार केली जात असल्याचे आढळले. बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे 200 लिटर स्पिरिट, 30 लिटर विदेशी मद्य, 180 मिली क्षमतेच्या 440 बनावट ब्रॅण्डच्या बाटल्या, बनावट देशी मद्याच्या 180 मिलीच्या 384 बाटल्या, तसेच देशी भिंगरी व संत्रा लेबलच्या बाटल्या, बनावट देशी व विदेशी दारूची बूच, 210 लिटर हातभट्टीची दारू, देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, इसेन्स व फ्लेवर बॅरल, ड्रम, पिकअप असा सहा लाख 50 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक उषा वर्मा, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एस. बी. शेंडे, एस. एम. सराफ, निरीक्षक ए. बी. बनकर, एस. के. कोल्हे, बी. बी. हुलगे, ए. व्ही. पाटील. पी. व्ही. अहिरराव, एम. डी. कोडे, व्ही. एम. बारवकर, एम. एस. धोका, एस. बी. भगत, जगताप, के. यू. छत्रे, घोडे, नम्रता वाघ या पथकाने ही कारवाई केली.
याच ठिकाणी यापूर्वी बनावट गुटख्याचा उद्योग
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने संजयनगर भागातील ईदगाह मैदानाजवळ छापा टाकला त्या ठिकाणी बर्फाचा कारखाना होता. हा कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे. यापूर्वी युनूस पटेल हा या ठिकाणी बनावट गुटखा तयार करीत होता. त्यासाठी पटेल याने तेलंगणा राज्यातून कारागीर आणले होते. पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. आता त्याच ठिकाणी बनावट दारू तयार केली जात असल्याचे उघड झाले आहे.






























































