लातूरमधील देवणीतून 12 लाख 78 हजार रुपयाचा देशी दारुचा मुद्देमाल जप्त

देवणी येथे बोरोळ चौकात एका पिकअप व्हॅनमधून पोलिसांनी 194 बॉक्स देशी दारु आणि 174 विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे एका अल्पवयीन मुलाकडून चोरी केलेला 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे देवणी हद्दीत विनापास परवाना देशी दारूची अवैध विक्री/ व्यवसाय करण्यासाठी देशी दारूची वाहतूक करण्यात येत आहे.अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोरोळ चौकात सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार एक पांढऱ्या रंगाची पिकअप व्हॅन येताना दिसली. पथकाने पिकअप व्हॅनला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूचे 194 बॉक्स व 174 देशी दारूच्या बाटल्या आढळल्या.

देशीदारूची अवैध विक्री/व्यवसाय करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणारे नागनाथ गंगाधर बिराजदार (वय 28 वर्ष, रा. वडमुरंबी, तालुका देवणी), सागर मोरखडे (रा.-निटूर तालुका शिरूर आनंतपाळ) यांच्याविरोधात पोलीस ठाणे देवणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार कांबळे करत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने पोलीस ठाणे विवेकानंद चौक लातूर येथे दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले असून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या 3 हॉर्स पावरच्या 3 मोटर्स पंप व एक मोटर सायकल असा एकूण 74 हजार रुपयाचा मुद्देमाल गुन्ह्यातील अल्पवयीन चोरट्यांकडून जप्त केला आहे. ही कारवाई केलेल्या पथकात पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सपोनि बहुरे, सपोउपनि संजय भोसले पोलीस अंमलदार रवी गोंदकर, बालाजी जाधव, यशपाल कांबळे, नाना भोंग, सचिन धारेकर, बंटी गायकवाड, राहुल सोनकांबळे , भिष्मानंद साखरे , प्रदीप चोपणे यांचा सहभाग होता.

आपली प्रतिक्रिया द्या