
सामना प्रतिनिधी । खेड
वाळू उत्खननाला बंदी असतानाही खेडमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतुक सुरु आहे. खाडीपट्टा पसिसरात केल्या जाणाऱ्या अवैद वाळू उत्खननाबाबत नागरिकांच्या तक्रारी असताना देखील महसूल विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पर्यावरणाच्या कारणास्तव न्यायालयाने कोणत्याही प्रकारच्या उत्खननावर बंदी घातली आहे. खेड तालुक्यातील खाडीपट्टा परिसरातही उत्खननाला बंदी आहे. मात्र या परिसरात मोठय़ा प्रमाणात अवैध वाळूचे उत्खनन केले जात आहे. हातपाटीद्वारे वाळू उत्खननला शासनाने काही अटी आणि शर्थींवर परवानगी दिली होती. मात्र ती परवानगीही 31 जूनला संपली आहे.
हातपाटीने वाळू काढण्याच्या परवानगीची मुदत संपल्यावर कोणत्याही प्रकारे वाळूचे उत्खनन करायचे नाही असे शासकिय संकेत आहेत. मात्र शासनाचे हे सारे संकेत पायदळी तुडवून खाडीपट्टा परिसरात ड्रेजरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात खाडीतील वाळू काढली जात आहे. इतकेच नव्हे तर अवैधरित्या काढली जाणारी वाळू रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत अपेक्षित ठिकाणी वितरीतही केली जात आहे.
खाडीपट्टा परिसराला जोडणाऱ्या खेड-बहिरवली मार्गावर होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीला चाप लावण्यासाठी याच मार्गावरील मुंबके येथे महसूल विभागाचे चेकपोस्ट उभे करण्यात आले आहे. या चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांनी अवैध वाळू वाहतुक करणारे डंपर अडवून त्यांच्यावर कारवाई करायची आहे. मात्र सद्यस्थितीत या चेकपोस्टमध्ये महसूलचा कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी हजर नसल्याने या मार्गावर वाळू वाहतुक राजरोसपणे सुरु आहे.
खाडीमध्ये वाळू काढण्यासाठी लावण्यात येणारे ड्रेजर रात्रभर सुरु असतात त्यामुळे या परिसरातील नागरिकांना रात्रभर ध्वनीप्रदुषणाचा त्रास सहन करावा लागतो. काहींना तर निद्रानाशाचा आजारच जडलेला आहे. ड्रेजरच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत येथील नागरिकांनी महसुल विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र महसुलचे अधिकारी हाताची घडी आणि तोंडावर बोट असे वागत असल्याने नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे.
वाळू उत्खननाला बंदी असताना अवैधरित्या वाळू काढणे आणि वाहतुक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. महसूल विभागाने याबाबत योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे. मात्र शहरातून राजरोसपणे अवैध वाळूची वाहतुक सुरु असतानाही महसूल अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने अधिकारी वाळू तस्कराच्या दावणीला तर बांधले गेले नाहीत ना असा संशय यायला लागला आहे.


























































