फुटपाथवरच बोगस पेट्रोलपंप थाटून भेसळयुक्त डिझेलचा काळाबाजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 फुटपाथवरच बेकायदेशीर पेट्रोल पंप थाटून क्लीन अप वाहनांमध्ये भेसळयुक्त डिझेल भरून मोबदल्यात पालिकेकडून पाहिजे तशी रक्कम घेण्याचा काळाबाजार सुरू होता. हा गोरखधंदा आर्थिक गुन्हे शाखेच्या नियंत्रण पथकाने उद्ध्वस्त केला.

पालिकेकडून क्लीन अप गाडय़ांचे कॉण्ट्रक्ट घेतलेल्या कंपनीने धारावी व माहीममध्ये आपल्या कायदेशीर कार्यालयाच्या बाजूलाच बेकायदेशीर कंटेनर ठेवून त्यात मोठय़ा सिंटेक्सच्या टाक्या ठेवल्यात. तसेच डिझेल भरण्यासाठी लागणारी यंत्रणादेखील तेथे उभी केली आहे. त्या टाक्यांमध्ये भेसळयुक्त डिझेल भरून मग ते नागरिकांना विकले जात आहे. शिवाय क्लीन अप गाडय़ांमध्येदेखील तेच भेसळयुक्त स्वस्तातले डिझेल भरून त्याची बाजारभावाप्रमाणे पावती बनवली जाते आणि ती पावती पालिकेला देऊन पैसे उकळले जात असल्याची खबर नियंत्रण पथकाचे प्रभारी निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. याची तत्काळ दखल घेत नितीन पाटील यांनी चंद्रकांत वलेकर, गणेश डोईफोडे, विशाल यादव, महेश कोळी, महेंद्र दरेकर व पथकाने त्या दोन्ही ठिकाणी छापा टाकला आणि तेथे भेसळयुक्त डिझेलचा सुरू असलेला काळाबाजारचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी 12 लाखांचे भेसळयुक्त डिझेल जप्त करून सुपरवायझर इंद्रसिंग राठोड याला अटक केली.