
थळ ग्रामपंचायत हद्दीतील समुद्रकिनारी असलेल्या गुरे चरणाच्या जागेत कोळी बांधवांनी अनधिकृत बांधलेले मच्छी सुकविण्याची खळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ग्रामपंचायतीने बीडीओ, पोलीस, महसूल यंत्रणेच्या देखरेखीखाली गुरुवारी जेसीबी लावून उखडून टाकली. यावेळी कोळी महिलांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला होता. या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाच वर्षापासून या अनधिकृत खळ्याबाबत कोळी समाजाचा लढा सुरू होता. अखेर यावर सर्वोच्च न्यायालयाने पडदा पाडून खळी काढण्याचे आदेश दिले.
मौजे थळ ग्रामपंचायत हद्दीत समुद्रकिनारी सर्व्हे नंबर 345/1 ची साडेपाच हेक्टर गुरुचरण आहे. या जागेवर थळमधील कोळीबांधवांनी अनधिकृतपणे मच्छी सुकविण्याची मातीची आणि सिमेंटची खळी तयार केली होती. ही जमीन गुरांना चारा चरण्यासाठी गुरुचरण म्हणून आरक्षित असतानाही या जमिनीवर खळी तयार करण्यात आली होती. याबाबत सचिन कदम यांनी गुरे चरण जागेवर झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत लोकपाल यांच्याकडे 2016 साली तक्रार केली होती. त्यानुसार लोकपाल यांनी अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले होते. या आदेशाविरोधीत कोळी बांधव उच्च न्यायालयात गेले होते. मात्र उच्च न्यायालयानेही त्यांच्याविरोधात निकाल दिला होता. त्यामुळे कोळी बांधवांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. कोळी बांधवांच्या वतीने मदन कोळी व प्रवीण तांडेल हे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी वेळी हजर होते. सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिस्तरीय खंडपीठाने 24 जानेवारी 2020 रोजी अनधिकृत जागेवर केलेले बांधकाम व शेड पाडण्याचे आदेश दिले होते. यावेळी कोळी बांधवांचे प्रतिनिधी मदन कोळी व प्रवीण तांडेल यांनी आम्ही सिमेंट खळी व झोपडी तोडू असे न्यायालयात सांगितले होते. तीन महिन्यात हे बांधकाम स्वतःहून न तोडल्यास पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
थळ ग्रामपंचायतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने खळी बांधणाऱ्या कोळी बांधवांना नोटीस दिल्या होत्या. मात्र तीन महिन्यात कोळी बांधवांनी खळी निष्काषित न केल्याने अखेर ग्रामपंचायतीने बीडीओ, भूकर मापक, तहसील कार्यालय कर्मचारी, पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम व सिमेंट खळी पाडण्यात आली. यावेळी कोळी महिलांनी जेसीबीच्या समोर येऊन काम अडविण्याचा प्रयत्न करून गोंधळ घातला होता. यावेळी पोलिसांनी परिस्थिती हाताळून कोळी महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला.






























































