खारफुटी तोडून उभारलेल्या दिव्यातील इमारतींवर बुलडोझर फिरवणार

748

खारफुटीची कत्तल करून त्यावर उभारण्यात आलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर काल ठाणे महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक दिव्यात डेरेदाखल झाले खरे पण या पथकातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना संतप्त रहिवाशांनी रेल्वे फाटकाजवळच रोखून धरले. त्यामुळे दिव्यात प्रचंड तणाव निर्माण झाला. अखेर शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात हे पथक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी बेकायदा चाळी आणि इमारतींचे पाणी व वीज कनेक्शन तोडले. सोमवारपासून या बांधकामांवर कारवाई केली जाणार असल्याने या इमारतींमधील 55 कुटुंबांवर ऐन पावसाळ्यात रस्त्यावर येण्याची वेळ येणार आहे. दरम्यान पालिकेच्या पथकाला रोखणार्‍यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्र्यातील काही भागांत खारफुटीची कत्तल करून हजारो चाळी आणि काही इमारती बांधण्यात आल्या आहेत. मुंब्र्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते इराकी आरिफ नवाज यांनी याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन दिवा आणि मुंब्र्यातील अशाप्रकारे खारफुटीची कत्तल करून उभारण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने ठाणे पालिकेला दिले होते.

सुट्टीच्या दिवशीही तोडकाम

आज सुट्टीच्या दिवशीच उपायुक्त मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे 12 अधिकारी आणि इतर पथके दिव्यात दाखल झाली. आपल्या इमारतींवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक आल्याचे कळताच येथील रहिवाशांनी थेट रेल्वेस्थानकावर धाव घेतली आणि त्यांना फाटकाजवळ रोखत दिव्यात शिरण्यास मज्जाव केला. संतप्त रहिवाशांनी घोषणाबाजीही सुरू केली. अखेर 180 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तात पालिकेचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी तेथील पाच इमारती तसेच चाळींचे पाणी व वीज कनेक्शन कापले. जलवाहिन्याही तोडण्यात आल्या. काही पंपही जप्त करण्यात आले. पालिकेने अचानक सुरू केलेल्या कारवाईमुळे रहिवाशांमध्ये मोठा प्रक्षोभ उडाला होता. परंतु ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असून सोमवारी या इमारती जमीनदोस्त करण्यात येतील अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या