राज्यभरातील अतिक्रमित झोपडीधारक होणार अधिकृत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची वेगाने अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईवगळता राज्यभरातील अतिक्रमित झोपड्या अधिकृत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यभरातील सरकारी जमीन, महापालिकांच्या जमिनीवरील बांधकामे नियमित करण्याच्या या निर्णयामुळे झोपडीधारकांना दिलासा मिळणार आहे.

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या महसूल विभागाच्या जमिनींवरील अतिक्रमणे नियमित करून अतिक्रमणधारकांना पट्टेवाटप करण्याबाबत शासनाने नोव्हेंबर 2018 मध्ये मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या आहेत. नागरी स्थानिक संस्थांच्या क्षेत्रात वन विभाग वगळता इतर शासकीय जमिनींवरील अतिक्रमित झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करण्यासाठी या मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णयही मार्च 2019 मध्ये घेण्यात आला. मात्र नागरी क्षेत्रातील खासगी जमिनींवर वर्षेनुवर्षे अतिक्रमण करून राहत असलेल्या अतिक्रमणधारकांना त्यांची अतिक्रमणे नियमित करून भाडेपट्टा देण्याबाबत कोणतीही तरतूद नव्हती. या कारणाने ‘सर्वांसाठी घरे 2022’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ संबंधित जमिनीवरील अतिक्रमणधारकांना देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे.