रिक्षा, व्हॅन, टॅक्सीमधून विद्यार्थी वाहतूक; आतापर्यंत दीड हजार बेकायदा वाहनांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिक्षा, व्हॅन, टॅक्सी आदी वाहनांमधून विनापरवाना विद्यार्थी वाहतूक करणार्‍या राज्यभरातील एक हजार 502 बेकायदा वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत दोषी वाहनचालकांकडून 41 लाख 66 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 614 वाहने जप्त करण्यात आली आहेत. राज्य सरकारनेच हायकोर्टात प्रतिज्ञापत्रावर ही माहिती दिली आहे. या माहितीनुसार मुंबईत बेकायदा विद्यार्थी वाहतूक करणारी 113 वाहने आढळली आहेत.

स्कूल व्हॅनमधून होणारी विद्यार्थी वाहतूक, स्कूल व्हॅनना होणार्‍या अपघाताप्रकरणी पॅरेंटस्-टीचर्स युनायटेड फोरमने जनहित याचिका दाखल केली असून मंगळवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत स्कूल बस तसेच इतर वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली. हायकोर्टाने हे प्रतिज्ञापत्र स्वीकारत याबाबतची सुनावणी जानेवारीपर्यंत तहकूब केली.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही तुमचीसुद्धा जबाबदारी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवरून खंडपीठाने पालक तसेच शिक्षकांनाही फैलावर घेतले. सगळीच जबाबदारी ही कोर्टावर ढकलू नका, तर विद्यार्थ्यांना शाळेत सुखरूप कसे सोडता येईल याची जबाबदारी पालकांनी तसेच शाळा प्रशासनानेही घेतली पाहिजे. सगळ्याच गोष्टीवर कोर्ट लक्ष ठेऊ शकत नाही अशा शब्दांत न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना सुनावले.  

कोर्टात सादर केलेली माहिती

राज्यातील 5,784 स्कूल बसची तपासणी.

स्कूल बस व्यतिरिक्त विद्यार्थी वाहतूक करणारी 5,290 वाहने.

कारवाई करण्यात आलेल्या स्कूल बस 1,286.

इतर बेकायदा वाहने 1,502.  

कोल्हापुरात सर्वाधिक बेकायदा विद्यार्थी वाहतूक

कोल्हापुरात बेकायदा वाहनातून विद्यार्थी वाहतूक करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 338 बेकायदा वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. तर ठाण्यात 259 बेकायदा वाहने आढळून आली आहेत.