
सामना प्रतिनिधी । मालवण
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर तळाशील-वायंगणी येथील समुद्रात घुसखोरी करून अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या मलपी कर्नाटक येथील एक हायस्पीड ट्रॉलर मत्स्यव्यवसायच्या ‘शीतल’ या गस्तीनौकेने गुरुवारी पकडला. ट्रॉलर सायंकाळी मालवण बंदरात आणण्यात आला. ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात मासळी असून सायंकाळी उशिरापर्यंत मासळीची लिलाव प्रक्रिया सुरू होती. घुसखोरी केलेल्या अन्य काही ट्रॉलर्सनी कारवाईस आलेल्या गस्तीनौकेलाच घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, गस्तीनौकेवर हत्यारबंद पोलीस असल्याचे दिसताच तसेच दुसरी गस्ती नौकाही त्याच वेळी दाखल झाल्याने घेरलेल्या ट्रॉलर्सनी पळ काढला.
काही दिवसांपूर्वी निवती रॉकनजीकच्या समुद्रात मासेमारीस गेलेल्या दोन पारंपरिक मच्छीमारांच्या होड्यांना मलपीतील हायस्पीड ट्रॉलर्संनी घेरल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे मलपीतील ट्रॉलर्सधारकांच्या या दहशतीविरोधात संतप्त पारंपरिक मच्छीमारांनी समुद्रातच त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला होता. मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी मलपीतील ट्रॉलर्सच्या दहशतीकडे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक व मत्स्य व्यवसाय आयुक्तांशी संपर्क साधत विशेष गस्त मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मत्स्य व्यवसाय व पोलीस यांची संयुक्त गस्ती मोहिम राबविण्यात येत आहे.
गुरुवारी सकाळी तळाशील समुद्रात मलपीतील ट्रॉलर्स घुसखोरी करत मासेमारी करत असल्याचे दिसताच पारंपरिक मच्छीमारांनी मच्छीमार नेते बाबी जोगी यांचे लक्ष वेधले. त्यांनी तत्काळ मत्स्य व्यवसायच्या अधिकार्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यानुसार मत्स्य व्यवसायचे अधिकारी राजकुमार महाडीक, मत्स्य परवाना अधिकारी सतीश खाडे हे शीतल व ओमसाई कलावती या दोन गस्तीनौकेवरून पोलीस कर्मचारी अमित हरमलकर, देवेंद्र लुडबे यांच्यासह समुद्रात रवाना झाले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तळाशील-वायंगणी येथील अठरा वावाच्या आत मलपीतील ट्रॉलर्स अवैधरीत्या मासेमारी करत असल्याचे त्यांना दिसून आले. यातील शीतल गस्तीनौकेने यातील एका मलपीच्या हायस्पीड ट्रॉलरला पकडले. हा प्रकार लक्षात येताच परिसरात असलेल्या मलपीतील अन्य हायस्पीड ट्रॉलर्संनी या गस्तीनौकेस घेरले. यावेळी मत्स्य व्यवसायची दुसरी गस्तीनौकाही तेथे दाखल झाली. हत्यारबंद पोलीस गस्तीनौकेवर असल्याचे दिसताच मलपीतील अन्य ट्रॉलर्संनी तेथून पळ काढला. या प्रकारावरून हत्यारबंद पोलीस असलेल्या गस्तीनौकेसही घेरण्याचा प्रयत्न मलपीतील हायस्पीड ट्रॉलर्सधारकांकडून झाल्याने शासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
पकडलेला हायस्पीड ट्रॉलर श्री सप्तगिरी हा गिरिजा पुजारे यांच्या मालकीचा आहे. ट्रॉलरवर तांडेल व खलाशी अशी सात माणसे आहेत. ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात मासळी सापडली असून सायंकाळी उशिरापर्यंत त्याची लिलाव प्रक्रिया सुरू होती. लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून ट्रॉलरविरोधात तहसिलदारांसमोर कारवाई प्रस्ताव सादर केला जाणार आहे. मालवण बंदरात ट्रॉलर आणून पंचनामा करण्यात आला आहे. यापूर्वी कारवाईस आणलेले ट्रॉलर पळून गेल्याच्या घटना लक्षात घेता पकडलेला ट्रॉलर पळून जाऊ नये यासाठी त्याचे हॅण्डल व जीपीएस यंत्रणा ताब्यात घेण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसायचे अधिकारी राजकुमार महाडिक यांनी दिली.
मत्स्य व्यवसायच्या अधिकार्यांनी समुद्रात सोसाट्याचा वारा असतानाही गस्तीनौकेद्वारे मलपीतील ट्रॉलर पकडण्याचे धाडस दाखविले. याबद्दल मच्छीमार नेते बाबी जोगी, रविकिरण तोरसकर, संतोष देसाई यांनी त्या ट्रॉलरवर जात मत्स्य व्यवसाय अधिकारी राजकुमार महाडिक, सतीश खाडे यांचे अभिनंदन केले.

























































