अनधिकृत पाणी उपशामुळे तलावातील मृतसाठाही संपण्याची वेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पांढरवाडी लघुसिंचन तलावात कडक उन्हाळ्यात पशु, पक्षी व मुक्या जनावरांसाठी आरक्षित असलेल्या पाणी साठ्यामधून काही शेतकऱ्यांनी अनधिकृतरित्या पाणी उपसा सुरूच ठेवला आहे. यामुळे तलावातील मृतसाठाही संपण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेता तात्काळ विनापरवाना पाणी उपसा करणाऱ्याच्या मोटारी बंद करून परिसरातील गावकऱ्यांसह ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी येरोळ येथील ग्रामपंचायतीने केली आहे. त्यासाठी  तहसीलदार व जिल्हाधिकारी लातूर व घरणी प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे.

दिवाळीपासून पाणी टंचाईच्या झळा येरोळ व पांढरवाडी या गावाला सोसाव्या लागत आहेत. यावर्षी अल्प पावसामुळे नदी नाले कोरडे राहीले. पांढरवाडी लघु प्रकल्प भरलाच नाही. उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत या तलावांमधून काही शेतकरी राजकीय वजन वापरून पाण्याचा बेसुमार उपसा करून गहू, हरभरा, ऊस, ज्वारी, यासह अन्य पिके जगवितात. खरे पाहता तलावात असलेल्या पाणीसाठ्याच्या ५० टक्क्यापर्यंत परवानगीने पाणी घेऊन पिके जगविता येतात. मात्र पाण्याची पातळी खाली जात असताना देखील पशु, पक्षी, मुक्या प्राण्यांची गय न करता सर्रास उपसा करून पाण्याची नासाडी करत आहेत. परिणामी आजघडीला दहा हजार लोकसंख्या असलेल्या येरोळ व पांढरवाडीला लाभदायी ठरणाऱ्या या  तलावात असलेला पाणीसाठा हा जवळपास मृत होण्याच्या टोकाला आला आहे. असे असताना देखील या तलावातून काही शेतकऱ्यांनी विद्युत मोटारीने पाणी उपसा करून शेतीला देत आहेत. तरी देखील पाटबंधारे विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.

तलावातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अवैध उपसा होऊ लागल्यामुळे तलावातील पाणी संपल्याने तो आता जोत्याखाली गेला आहे. या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेली मुकी जनावरे, पाणी, पशु – पक्षांची पाण्याअभावी तारांबळ होऊन दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. ही बाब लक्षात घेता तलावात सुरू असलेल्या मोटारी बंद करून शिल्लक असलेला मृतसाठा राखून ठेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी येरोळ येथील ग्रामपंचायतीने ठराव घेऊन तहसिलदाराला लेखी निवेदन दिले आहे.