तिसरी लाट- बेफिकिरी नको, सावध राहा! इंडियन मेडिकल असोसिएशनचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची तिसरी लाट अत्यंत जवळ आली आहे. इतर देशांतील परिस्थिती व कुठल्याही महामारीचा इतिहास पाहता कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे. याबाबत पेंद्र व राज्य सरकारांनी अधिक सावध राहायला हवे. कोरोना लढय़ात कुठलीही हयगय करू नका, असा स्पष्ट इशारा ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) दिला आहे. देशाच्या बहुतांश भागांत सरकार व लोकांचा अतिउत्साह दिसत आहे. कोविड नियमावली धाब्यावर बसवून गर्दी करताहेत. हे अत्यंत धोक्याचे आहे, असेही ‘आयएमए’ने म्हटले आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव ओसरू लागला आहे. याचदरम्यान ‘आयएमए’ने विषाणूच्या तिसऱया लाटेबाबत सावध केले आहे. आरोग्य यंत्रणा तसेच सरकार पातळीवरील अथक परिश्रमांच्या जोरावर आपला देश कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेतून बाहेर आला आहे. अशा परिस्थितीत तिसरी लाट घातक होऊ न देण्याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे आवाहन ‘आयएमए’ने केले आहे. ‘आयएमए’ ही देशभरातील डॉक्टरांची सर्वेच्च संघटना आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना लोक पुन्हा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. या परिस्थितीवर संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. अनेक राज्यांत सरकार तसेच लोक अतिउत्साहाने वागून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी व धोकादायक आहे, अशा शब्दांत ‘आयएमए’ने लोकांच्या बेफिकीर वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

पर्यटन, धार्मिक यात्रांसाठी दोन–तीन महिने वाट पाहा!

पर्यटनस्थळांच्या आवारात होत असलेल्या गर्दीच्या अनुषंगाने ‘आयएमए’ने सावध केले आहे. पर्यटन, धार्मिक यात्रा, धार्मिक उत्सव आवश्यक आहेत, परंतु यासाठी आपण काही महिन्यांची वाट पाहू शकतो. पर्यटनस्थळे आणि सार्वजनिक समारंभ खुले करणे तसेच लस न घेतलेल्या लोकांनी तेथे मोठय़ा संख्येने एकत्र येणे हे कोरोनाची तिसरी लाट पसरवण्याचे मुख्य कारण बनू शकते. आपण पुढील दोन–तीन महिने कुठलीही जोखीम पत्करायला नको, असे ‘आयएमए’ने नमूद केले आहे.

  • कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या लोकांचे सार्वजनिक ठिकाणी फिरणे घातक आहे. हे लोक कोरोना विषाणूचे ‘सुपरप्रेडर’ ठरू शकतात.
  • लसीकरणाची व्याप्ती वाढवून तसेच कोरोना नियमावलीचे पालन करूनच आपल्याला विषाणूच्या तिसऱया लाटेचा प्रभाव कमी करता येऊ शकतो. यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.

कोरोनाची तिसरी लाट 4 जुलैपासूनच सुरू झाली

 हैदराबाद – हिंदुस्थानातील कोरोनाची तिसरी लाट येणार का? कधी येणार? याविषयी देश-विदेशातील तज्ञ डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांकडून वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. मात्र  हैदराबाद येथील प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि माजी प्र-कुलगुरू डॉ. विपीन श्रीवास्तव यांनी 4 जुलैपासूनच देशात तिसरी लाट सुरू झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. डॉ. श्रीवास्तव यांनी गेल्या 15 महिन्यांपासून दररोज कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱया रुग्णांची संख्या याचा अभ्यास करून एक मॉडेल तयार केले असून त्याद्वारे त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. सध्या देशातील कोरोना संसर्ग स्थिती फेब्रुवारीतील पहिल्या आठवडय़ासारखी आहे. एप्रिलअखेरीस दुसरी लाट आली होती. लोक जर असेच कोरोना नियमांचा प्रोटोकॉल पाळणार नसतील, गर्दी करत राहतील तर तिसरी लाट उच्चांक गाठेल, असाही इशारा डॉ. श्रीवास्तव यांनी दिला आहे.