
योगगुरू बाबा रामदेव यांना इंडियन मेडिकल असोसिएशनने एक हजार कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. बाबा रामदेव यांनी व्हिडीओ जारी करून आयएमएची माफी मागावी आणि 15 दिवसांच्या आत लिखित माफी मागावी अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. असे न केल्यास एक हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असे आयएमएने म्हटले आहे.
आयएमएने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, बाबा रामदेव यांना ऍलोपॅथीमधील ए सुद्धा माहित नाही. त्यापूर्वी बाबा रामदेव यांनी आपली योग्यता सिद्ध करावी. तसेच बाबा रामदेव यांनी 15 दिवसांत माफी नाही मागितली तर त्यांच्यावर 1 हजार कोटी रुपयांचा दावा ठोकू असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.
IMA serves defamation notice on Ramdev for his alleged disparaging remarks against allopathy and allopathic doctors, demanding an apology within 15 days or Rs 1,000 crore compensation from him.
— Press Trust of India (@PTI_News) May 26, 2021
उत्तराखंडच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखेने बाबा रामदेव यांना नोटीस पाठवली आहे. आयएमने म्हटले आहे की, “बाबा रामदेव यांनी आपली औषधं विकली जावी यासाठी सातत्याने खोटं बोलत आहेत. बाबा रामदेव यांनी आपल्या औषधांची चाचणी केली आहे, परंतु कुठल्या रुग्णालयात या औषधांची चाचणी करण्यात आली हे त्यांनी सांगितलेच नाही. कारण त्यांनी या औषधाची कुठल्याच प्रकारची चाचणी केलेलीच नाही. डॉक्टरांविरोधात अशा प्रकारे वक्तव्य केल्यामुळे लोकांच्या मनात बाबा रामदेव यांच्याबद्दल राग आहे असेही आयएमने म्हटले आहे.
आपले औषध विकले जावे म्हणून बाबा रामदेव लसीकरणामुळे साईड इफेक्ट्स होत असल्याची जाहिरात करत आहे असे आयएमने म्हटले आहे. तसेच सरकारने बाबा रामदेव यांच्या विरोधात साथरोग कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही तर त्यांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करू असेही आयएमएने म्हटले आहे.





























































