
>> मलिका अमरशेख
कल्पना करणं, स्वप्न पाहणं ही मनाला वेगळ्या जगात नेणारी द्वारं. अशी ही फँटसीची राज्यं मनाला आणि मेंदूला आगळा दिलासा देतात. ती कोसळता कामा नये. त्यातून मिळणारं चैतन्य, सजीवपण हे या चराचराचा एक भाग आहेत. सत्याची, सृजनाची आणि अस्तित्वाची खूण पटवणारी ती आर्तता आहे.
कल्पना आणि आशय या दोन्ही परस्परपूरक अर्थपूर्ण गोष्टींना आपल्या आयुष्यात फार मोठं स्थान आहे. किंबहुना आपली प्रत्येकच गोष्ट त्यावर अवलंबून आहे. फिल्म, मीडिया, जाहिराती, नाटय़, गीत, गायन, वादन, नृत्य ते अगदी आपले घरातले नातेसंबंधही या गृहितकावरच अवलंबून आहे. आपण कल्पनेत एखादा सहचर वा स्वप्न वा ध्येय पाहतो… कधी ते पूर्ण होतं… कधी होत नाही… ‘नेव्हर एंडिंग स्टोरी’. त्यात एक लहान मुलगा पुस्तक वाचत असतो. पुस्तकात तो पात्र होतो. उडणाऱया प्रेमळ डोळ्याच्या कुत्र्याच्या पाठीवरून तो कल्पनेच्या साम्राज्यात जातो. तिथं कल्पनेच्या साम्राज्याची सुंदर राजकुमारी अगदी आसन्नमरण अवस्थेत असते. ती कळवळून सांगते, ‘कल्पना करणं थांबवू नका. प्लीज… नाही तर मी मरून जाईन!’ ही कल्पनाच किती कल्पक आहे! स्वप्न कल्पना पाहिलीच नाही तर ती नष्ट होईल… साकार होणारच नाही.
आपल्या घराची खिडकी जरा उघडून बाहेर पाह्यलं तर अगदी छोटय़ा लहानशा कल्पनांवरून अप्रतिम फिल्म बाहेरच्या जगात बघायला मिळतात. इराणी फिल्म ‘बरान’, ‘व्हाइट बलून’, ‘चिल्ड्रेन ऑफ हेवन’! छोटय़ा कल्पना न् मोठा आशय…त्या चित्रकविताच जणू… जसं कवितेमध्ये खूप थोडय़ा ओळींत खूप काही सांगायचं असतं…
‘मॉन अंकल’ ही मी फिल्म एप्रिसिएशन कोर्समध्ये ज्या सुंदर फिल्मस् पाहिल्या त्यातलीच एक… एक मुलगा न् त्याचा काका न् त्यांचं फॅमिली लाइफ एवढाच जीव. कुठल्या तरी गावात घडणारी पण आपल्याच गावातली शेजारची असावी असं वाटावी.
एकंदर गृहिणींमध्ये असंख्य प्रकार असतात. काहींच्या दृष्टीने घरची स्वच्छता हा जीवनमरणाचा प्रश्न असतो. (सुदैवानं की दुर्दैवानं आज तो तसाच झालाय) तर काहींना स्वच्छतेचं वावडं तर काही स्टेटस सिंबॉलमध्ये गुरफटलेल्या. या मुलाची आई स्वच्छता आणि स्टेटस जीवापाड सांभाळणारी. मुलाला स्वच्छ आंघोळ घालूनच ती थांबत नाही तर ब्रेकफास्टला ती उकडलेलं अंड पण ‘स्टरलाइज्ड’ करून देते आणि हा मुलगा स्वच्छ-शुद्ध-अत्यंत ‘स्टरलाइज्ड’ मुलगा आपल्या अंकलबरोबर ताबडतोब बाहेर पडतो तो गावातल्या गल्ल्यांत, छपरांवर, गाडीवरचं आईक्रिम खात-मस्त टवाळय़ा, खोडय़ा करीत चिखलमातीत मनसोक्त हुंदडतो…!
पण याच चित्रपटात डायरेक्टर न् आर्ट डायरेक्टर इतक्या भन्नाट कल्पना लढवतात की हॅटस् ऑफ! मग इमारतीतून माणसाचं नुसतं उतरणं पण दाखवताना कल्पना आविष्कार हा काय असू शकतो त्याचं प्रत्यंतर येतं. आता असं तर आपणही खूपदा बघतो, पण लक्षात येत नाही त्यातला सेन्स ऑफ ह्यूमर…! एकेक जिना उतरताना खिडक्याही वेगळय़ा असतात. त्यामुळे पाहणाऱयाला आधी हॅट मग डोकं अचानक हात, मग फक्त पाय असा थोडा थोडा तुकडय़ानं माणूस दिसतो. तसं पाहिलं तर सर्वच माणसं आपल्याला अशीच थोडय़ा थोडय़ा तुकडय़ा तुकडय़ानं दिसतात. कधी खडतर प्रसंगात वेगळी दुसऱया प्रसंगात वेगळे… वेगवेगळे तुकडे.. वेगवेगळे मुखवटे.!
‘व्हाइट बलून’ याही चित्रपटात आई मुलीला बटाटे आणण्यासाठी पैसे देते, पण येताना ते पैसे रस्त्याजवळच्या नाल्यात पडतात आणि मग पूर्ण चित्रपट ती आणि तिचा भाऊ ती नोट कशी मिळवण्याची खटपट करतात एवढीच कथाकल्पना! पण लहान मुलांचं निरागस जग, त्यांचं भावविश्व, त्यांचे प्रश्न-हे इतक्या अप्रतिम चित्रित केलं आहे की आपण त्या अनुभवविश्वाचा एक भाग होऊन जातो.
मानवी जीवनच नाही तर चराचराबद्दलची आत्मीयता-आपण संवेदना जाणू शकतो. दुसऱयाच्या दुःखाच्या वेदनेच्या आणि ती अनुभूती कल्पना करून आपण कुठल्या एका माध्यमातून अभिव्यक्त करण्याची कर्तव्यबुद्धी म्हणा बांधिलकी म्हणा ठेवतो हीच तर मानव्याची सजग खूण.
नुकतेच दिवंगत झालेले प्रखर बुद्धिवादी विचारवंत लेखक, दिग्दर्शक व अभिनेते गिरीश कर्नाड यांची ‘चराचर’ ही फिल्म एका चित्रप्रदर्शनात पाहिली. आत्यंतिक कवितिक पण तितकीच रूपकात्मक… आणि निसर्ग न् मानव यांचं नातं, सर्जन आणि स्त्राr यांचं नातं याबद्दल भाष्य न करता एका वेगळय़ाच उंचीवर नेलेली अनवट निर्मिती!
-सधन गोकुळ घरातली ती गृहिणी. तिच्या छोटय़ा नणंदेबरोबर छान नातं जुळलेलं… दोघी घराबाहेर जंगल जे त्यांच्या मालकीचं असतं तिथे विहिरीकडे जात-येत असतात. अचानक एकदा ती छोटय़ा नणंदेकडे आपलं गूढ गुपित सांगून टाकते. काही मंत्र म्हणून ती स्वतःचं झाडात खूप फुलं असलेल्या झाडांत रूपांतर करीत असते. फुलं तोडून झाली की ती नणंदेला मंत्र म्हणायला सांगताच ती पूर्ण स्त्राrरूपात पुनश्च येते अन् अचानकपणे ती छोटी नसताना ती पूर्ण बहाराचं झाड होते. त्याचवेळी तिचा सासरा ते जंगल विकून टाकतो न् कंत्राटदार येऊन तिथली पूर्ण झाडे तोडून गाडीत घालून घेऊन जाऊ लागतो. तेव्हाच तिचा नवरा येतो. त्याला छोटीकडनं हकीकत कळलेली असते, पण सर्व झाडे तोडलेली यात नेमकी ती कोणत्या झाडात आहे हे त्याला कळत नाही. तो हतबल, हतबद्ध स्तब्ध… इथं फिल्म संपते.
माणूस आणि निसर्गाचं इतकं सुंदर प्रतीक हे स्त्राrच असू शकते. कारण सर्जन-पुनरुत्पादन हे तिच्याच हाती आहे. बहरही तीच! झाडाइतकीच ती मूक आहे आणि ती चराचरात आहे. तुम्ही चैतन्य सर्जनता यांना वेगळं काढू शकत नाही. कारण चैतन्य हे चराचरात सारखंच सामवलंय! आणि तसंही द्वैत असून ते अद्वैत आहे! प्रकृती हे स्त्राrला म्हटलं जातं आणि निसर्गालाही! त्या निसर्गाचं मिनिएचर फुललेलं झाड आणि स्त्री हे एकरूप झालेलं प्रतीक अत्यंत चपखल.
झाडांचं स्वरूप न् नाव जरी आपण वेगवेगळी दिली असली तरी त्यांचा स्वभावधर्म चैतन्यगाभा एकच असतो!
झाडं तोडल्यावर ‘लाकूड’ हा एकच शब्द असतो… तद्वत जीव गेल्यावर मानव एक चैतन्य गेलं देह गेलं एवढंच… काही माणसं म्हणतात, आत्मा उरतोच. पण देह नसतो मग देह न् लाकूड एकच झालं… ज्याचं ज्यातून चैतन्य नष्ट झालं- सजीवपण नष्ट झालं, जे या चराचराचा एक भाग होतं… तर ही कल्पना अत्यंत सनातन सत्याशी- निसर्गाशी- अस्तित्व- चैतन्य यांचं नातं एकरूपत्व मांडणारी निखळ नितांत अर्थगर्भ अशी रचना आहे.
चार्ली चॅप्लीनचा भटक्या- ‘द गुड अर्थ’मधला शेतकरी, ‘पथेर पांचाली’मधला अपू-इव्हन मायकेल अँजेलोनं केलेल्या कल्पना-काढलेली चित्रं- वास्तुशास्त्र्ाज्ञ म्हणून त्याच्या कल्पना-शिल्पं-रोदाँनं केलेला ‘थिंकर’, ईव्हन ज्यूल व्हर्नच्या भन्नाट कथाकल्पना न् ज्यूल व्हर्नचा टॉम ऍण्ड जेरी या सर्वांनीच सर्वांच्या थक्क करणाऱया अवर्णनीय अप्रतिम कल्पनांनी- आशयसूत्रांनी सर्व जगाला आनंद दिलाय, नवी जाणीव, नवं भान-नवा अनुभव, नवा आयाम दिला-हे विसरून नाहीच चालणार…
आठवतेय ती कल्पनांच्या साम्राज्याची निरागस नाजूक आजारी राजकन्या… कल्पना करणं सोडू नका… हे साम्राज्य कोलमडेल… मी मरून जाईन… ‘कल्पना करा…’!
खरंच… कल्पना करा… स्वप्न पहा.. फँटसीचं राज्य कोसळता कामा नये…फक्त शरीर मेंदूला आराम मिळावा म्हणून रात्र होत नसते. रात्र अशासाठी होते की आपण स्वप्न पहावीत. कल्पनांच्या नाजूक तलम पंख असलेल्या पऱया प्रत्येक चांदणीवर बसून वाट पाहते की कधी तुम्ही निद्रादेवीच्या राज्यात प्रवेश करता. मग हळूच त्या कल्पनांच्या पऱया तुमच्याजवळ उडत येतात हलकेच… तुमच्या कानात कुजबुजतात… त्यांच्या हातात चमचमणारी बासरी असते… त्या ती वाजवतात की सुंदर स्वप्नांचे सूर तुमच्याभोवती गुंजारव करतात… कल्पनांच्या पऱया न् स्वप्नांचे स्वर तुमचं आयुष्य सुंदर करतातच पण दुसऱया दिवशीची सकाळ न् दुसऱयांची आयुष्यपण सुंदर करतात! खरंचय्!




























































